सोलापूरच्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना गतीची चिन्हे!
१,४०० कोटींच्या पाणी योजनेला १५ जुलैपूर्वी मान्यता, १५ ऑगस्टपूर्वी २५ ई-बस, पाकणी जलशुद्धीकरण प्रकल्पालाही चालना

सोलापूर व्हिजन
सोलापूर शहरातील पाणीटंचाई, सार्वजनिक वाहतूक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याशी संबंधित तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढत बुधवारी नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनीही शहरातील प्रलंबित प्रश्नांचा ठाम पाठपुरावा करत विकासकामांना प्राधान्य देण्याची मागणी केली.
बैठकीत नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांच्यासमोर सोलापूरच्या १,४०० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा मांडण्यात आला. ही योजना जागतिक बँकेकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित असून काही तांत्रिक त्रुटींमुळे प्रक्रिया रखडली आहे. यावर चर्चा करताना संबंधित त्रुटींची पूर्तता करून १५ जुलैपूर्वी राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे आश्वासन अप्पर मुख्य सचिवांनी दिले.
सोलापूर शहरासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या १०० ई-बसच्या वितरणालाही बैठकीत प्राधान्य देण्यात आले. कंपनीशी करार आणि वाहनतळाची उभारणी पूर्ण होऊनही बस उपलब्ध होत नसल्याबद्दल पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अप्पर मुख्य सचिवांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून १५ ऑगस्टपूर्वी किमान २५ ई-बस सोलापूरला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
याशिवाय पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची वर्षभर प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी नगरविकास विभागाने विशेष पाठपुरावा करावा, अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूरच्या विकासाशी संबंधित प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन डॉ. गोविंद राज यांनी दिले.
मुख्यमंत्री पाठीशी असल्याने प्रकल्पांना वेग : देवेंद्र कोठे
यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर शहरावर विशेष प्रेम असून शहराच्या विकासातील कोणताही प्रकल्प रखडू नये, यासाठी ते स्वतः लक्ष देत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समन्वयातून प्रलंबित विकासकामांना निश्चितच गती मिळेल, असा विश्वास आहे.”