आज भाजपची ‘महाबैठक’! सोलापुरात आज शक्तिप्रदर्शन; संघटनात्मक तयारीचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार आढावा

आज भाजपची ‘महाबैठक’!

सोलापुरात आज शक्तिप्रदर्शन; संघटनात्मक तयारीचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार आढावा

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२० ऑगस्ट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सोलापुरात संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, गुरुवारी (२० ऑगस्ट) पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय महाबैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्याबरोबरच आगामी निवडणुकांसाठीची रणनीती निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, मंडल अध्यक्ष तसेच विविध आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता कितपत झाली, संघटनात्मक कामाची प्रगती काय आहे आणि आगामी काळातील नियोजन कसे असावे, यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

 

यानंतर दुपारी जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील ३५० हून अधिक भाजप नगरसेवकांची स्वतंत्र बैठक होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीत नगरसेवकांना पदवीधर मतदारांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दिवाळीनंतर पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने या मतदार नोंदणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

शहरातील पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती

 

सोलापुरात होणाऱ्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठकीच्या नियोजनात सक्रिय आहेत.

‘निवडणूक मोड’मध्ये संघटना

महापालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने भाजपची ही बैठक केवळ संघटनात्मक आढाव्यापुरती मर्यादित न राहता आगामी राजकीय समीकरणांनाही दिशा देणारी ठरण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाची ताकद, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि आगामी निवडणुकीचे नियोजन यावर वरिष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याबाबत अद्याप निश्चितता नसली, तरी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमुळे आजच्या बैठकीकडे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचे विशेष लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *