नारळी पौर्णिमेला पद्मशाली समाजाच्या संस्कृतीचा जागर
सूर्योदय ढोल-ताशा पथकासह प्रथमच महिला लेझीम पथकाची दमदार उपस्थिती; अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचे आवाहन
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२७ ऑगस्ट
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या निमित्ताने अखिल भारत पद्मशाली संघम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपतानाच नव्या पिढीचा सहभाग वाढविण्यावर या उपक्रमातून भर देण्यात आला आहे.

या सोहळ्यात सूर्योदय ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण तसेच प्रथमच महिला लेझीम पथकाचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरणार आहे. महिलांच्या लेझीम पथकाच्या सहभागामुळे कार्यक्रमाला नवे स्वरूप मिळणार असून, महिला शक्तीला सांस्कृतिक व्यासपीठ देण्याचा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार आहे.
यावेळी मार्कंडेय ज्योत्सवाच्या महामुनी आग्रहाचे निमंत्रण समाजबांधवांना देण्यात आले आहे. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने समाजातील नागरिकांना शुभेच्छा देत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील पारंपरिक संस्कृती जपत तिची पुढील पिढीशी सांगड घालणे, तसेच महिलांचा आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हा संघमचा प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. कोठे यांनी सांगितले.
ढोल-ताशांचा गजर, महिला लेझीम पथकाचे सादरीकरण आणि धार्मिक वातावरण यामुळे नारळी पौर्णिमेचा हा सोहळा पद्मशाली समाजासाठी विशेष ठरणार आहे. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.