‘फाईल गहाळ’ प्रकरणात तत्कालीन नगरअभियंता सुभाष सावस्कर दोषमुक्त
पुराव्याचा अभाव, कायदेशीर मान्यतेतील त्रुटी; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि.२१ जुलै
सोलापूर महापालिकेतील पाच महत्त्वाच्या फाईली जाणीवपूर्वक गहाळ करून महापालिकेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या बहुचर्चित प्रकरणात तत्कालीन नगरअभियंता सुभाष बळीराम सावस्कर यांना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. पुराव्याचा अभाव आणि खटला दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर मान्यतेतील त्रुटी लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री. गुडेवार यांनी ३० ऑक्टोबर २०१३ रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यामध्ये सन २००९ ते २०१३ या कालावधीत नगरअभियंता म्हणून कार्यरत असताना सुभाष सावस्कर आणि भूमी-मालमत्ता विभागातील अन्य तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पाच महत्त्वाच्या फाईली जाणीवपूर्वक गहाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी २८ डिसेंबर २०१६ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, सावस्कर यांनी ॲड. शशी कुलकर्णी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत नगरअभियंत्याचे पद हे तांत्रिक स्वरूपाचे असून संबंधित फाईलींचा ताबा किंवा प्रशासकीय जबाबदारी त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच तपासात त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे आणि खटला दाखल करण्यासाठी आवश्यक कायदेशीर मंजुरीही घेण्यात आली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळल्यानंतर सावस्कर यांनी सत्र न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. गावडे यांनी प्रकरणातील कागदपत्रे, उपलब्ध पुरावे, उच्च न्यायालयाचे निर्देश आणि कायदेशीर बाबींचा सखोल विचार केला. आरोपीविरुद्ध खटला पुढे चालविणे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सावस्कर यांना दोषमुक्त करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात सावस्कर यांच्यावतीने ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. गुरुदत्त बोरगावकर, ॲड. प्रसाद अग्निहोत्री आणि ॲड. आदित्य अदोने यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲड. पी. एस. जन्नू यांनी बाजू मांडली.