अन्नदानातून उभा राहिला सेवाधर्माचा आदर्श; श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या कार्याची सुवर्णाक्षरांनी नोंद
अक्कलकोटमध्ये हजारो भाविकांना मोफत , सामाजिक उपक्रम आणि युवकांना सेवाभावाची प्रेरणा देणाऱ्या जनमेजयराजे भोसले यांच्या कार्याचा गौरव

सोलापूर व्हिजन | अक्कलकोट, दि.२९ जुलै
श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरी अक्कलकोटमध्ये गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरू असलेले अन्नदान, भाविकांसाठी विविध सुविधा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आज सेवाभावी संस्थेचा आदर्श म्हणून ओळखले जात आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या या कार्याची नोंद आता केवळ अक्कलकोटपुरती मर्यादित न राहता राज्यभरातील सेवाभावी संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


अन्नदान हे भारतीय संस्कृतीतील सर्वोच्च दान मानले जाते. ही परंपरा जपत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने लाखो भाविकांना मोफत महाप्रसाद उपलब्ध करून दिला आहे. स्वामी दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना कोणताही भेदभाव न करता भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, ही मंडळाची सर्वात मोठी ओळख बनली आहे.
केवळ महाप्रसादापुरते कार्य मर्यादित न ठेवता मंडळाने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवक संघटन, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांतही उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. स्वामी भक्तांमध्ये सेवाभाव, शिस्त आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्यासाठी युवकांना संघटित करून विविध सामाजिक मोहिमांमध्ये सहभागी करून घेतले जाते.
मंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या आधुनिक सुविधा, भाविकांसाठी निवास व्यवस्था आणि भविष्यातील विकास आराखड्यामुळे अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनालाही नवी दिशा मिळत असल्याचे मानले जाते. यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीबरोबरच शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे.
जनमेजयराजे भोसले यांनी सेवेला कधीही प्रसिद्धीचे माध्यम न बनवता ती समाजाप्रती असलेली जबाबदारी मानून सातत्याने कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी विश्वराज भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी फळी सेवाकार्यात सक्रिय असून, प्रत्येक उपक्रमात नियोजन, पारदर्शकता आणि समर्पण दिसून येते.
गुरुपौर्णिमा, स्वामी प्रकटदिन, धार्मिक उत्सव तसेच विविध सामाजिक अभियानांच्या माध्यमातून हजारो स्वयंसेवकांना समाजकार्यासाठी जोडण्याचे कार्यही मंडळाने यशस्वीपणे केले आहे. त्यामुळे अन्नछत्र मंडळ हे केवळ धार्मिक संस्था न राहता समाजहिताला प्राधान्य देणारे लोकचळवळीचे केंद्र म्हणून विकसित होत आहे.
अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदानासोबतच स्वच्छता, शिस्त, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देणारे हे कार्य समाजातील इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. समाजाच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या या सेवायज्ञामुळे “अन्नदान हेच श्रेष्ठ दान” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असून, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य भविष्यातही समाजसेवेच्या सुवर्णपानांवर कायम स्मरणात राहील, असा विश्वास स्वामीभक्तांकडून व्यक्त केला जात आहे.