लेडी डफरीन हॉस्पिटलमध्ये लवकरच जनरल सोनोग्राफी !

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक पाऊल 

लेडी डफरीन हॉस्पिटलमध्ये लवकरच जनरल सोनोग्राफी ; नागरिकांच्या मागणीला महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.३० जुलै

राजमाता अहिल्यादेवी होळकर (लेडी डफरीन) रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी जनरल सोनोग्राफी सेवा नियमितपणे सुरू करण्याची मागणी आता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नगरसेवक सीए. विनोद धर्मा भोसले आणि भाजप मंडल अध्यक्ष नागेश खरात यांनी महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांकडे संयुक्त निवेदन देत ही सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. या मागणीला महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली आहे.

सध्या लेडी डफरीन रुग्णालयात केवळ गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पोटदुखी, किडनी, यकृत, पित्ताशय, थायरॉईड तसेच इतर विविध आजारांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली जनरल सोनोग्राफी सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी निदान केंद्रांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

भोसले आणि खरात यांनी महापालिकेकडे आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि आधुनिक उपकरणांची उपलब्धता करून ही सेवा नियमितपणे सुरू करण्याची मागणी केली. ही सुविधा सुरू झाल्यास शहरातील हजारो नागरिकांना कमी खर्चात आणि त्यांच्या परिसरातच दर्जेदार निदान सेवा मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक भूमिका मांडली. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून जनरल सोनोग्राफी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली.

 

महापालिकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, सरकारी रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

 

निवेदन देताना शाहू महाराज सलगर, श्रीकांत गायकवाड, दिनेश जाधव, चंद्रकांत पात्रे, सौरभ साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *