मार्कंडेय रथोत्सवाने पूर्वभाग दुमदुमला!
‘जय मार्कंडेय’च्या जयघोषात पारंपरिक संस्कृतीचा जागर; लेझीम, ढोल-ताशे, आकर्षक देखावे अन् खाटूश्याम मंदिर ठरले मिरवणुकीचे आकर्षण
सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि. २८ ऑगस्ट :
‘जय मार्कंडेय…’च्या अखंड जयघोषाने, ढोल-ताशांच्या गजराने आणि लेझीमच्या तालाने सोलापूरचा पूर्वभाग शुक्रवारी अक्षरशः दुमदुमून गेला. पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी श्री मार्कंडेय यांच्या रथोत्सवानिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या गर्दीमुळे पूर्वभागातील प्रमुख रस्ते माणसांनी फुलून गेले होते.

डॉल्बीचा दणदणाट, ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे बहारदार खेळ, पारंपरिक नृत्याविष्कार, पौराणिक व धार्मिक देखावे तसेच विविध हलते देखावे यामुळे मिरवणुकीला मोठी रंगत आली. दत्तनगर, पद्मशाली चौक आणि पोलिस हेडक्वार्टर रोड परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी भाविक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सुताच्या पूजेची परंपरा जपली
पद्मशाली समाजात नारळी पौर्णिमेच्या धर्तीवर ‘नुलुपुन्नमी’ साजरी केली जाते. ‘नुलू’ म्हणजे सूत आणि ‘पुन्नमी’ म्हणजे पौर्णिमा. विणकामाशी जोडलेल्या या समाजात या दिवशी सुताची पूजा करण्याची परंपरा आहे. कापसाच्या राख्या आणि जानवे धारण करून समाजबांधवांनी ही परंपरा जपली.
रथोत्सवाच्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून मार्कंडेय मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. दर्शनावेळी ‘जय मार्कंडेय’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. पहिल्या मजल्यावर पुरोहितांकडून भाविकांना जानवे धारण करून कापसाच्या राख्या बांधण्यात आल्या.
धार्मिक विधींनी उत्सवाला सुरुवात
मार्कंडेय मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. महर्षी मार्कंडेय मूर्तीस रुद्राभिषेक पूजा मानकरी इंदापुरे व संगा परिवार तसेच प्रमोद कोंडा व प्रवीण कोंडा दांपत्याच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर शीतल शरद बोरला व सौजन्या अनिल अवधूत दांपत्याच्या हस्ते चंडीयाग व नवग्रह पूजा पार पडली.
पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते मंदिरावर पद्मध्वजारोहण करण्यात आले. मंदिराचे अर्चक राघवेंद्र आरकाल आणि पद्मशाली पुरोहित संघाच्या सहकार्याने धार्मिक विधी पार पडले.
रथपूजा अन् मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ
दुपारी मंदिरापासून रथाची पूजा सुदर्शन गुंडला यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्यालार यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली.
मिरवणुकीदरम्यान विजापूर वेस परिसरातील मुस्लिम बांधवांनी रथोत्सवाचे स्वागत करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. त्यामुळे धार्मिक उत्सवाला सामाजिक एकतेचीही जोड मिळाली.
चरख्यापासून हातमागापर्यंतचा वारसा मिरवणुकीत
पद्मशाली समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचे दर्शन घडविणारा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. एका वाहनावर उमा कारमपुरी आणि बालमणी पूलूर चरख्यावर सूत कातत होत्या. तर अंबादास करलो आणि लक्ष्मण गणपा सूतापासून हातमागावर भगवान मार्कंडेयांसाठी महावस्त्र विणत होते.या देखाव्यातून पद्मशाली समाजाचा पारंपरिक विणकाम व्यवसाय, श्रमसंस्कृती आणि धार्मिक श्रद्धा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
‘खाटूश्याम’च्या देखाव्याने वेधले लक्ष
श्री ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या राजस्थानमधील प्रसिद्ध श्री खाटूश्याम मंदिराच्या भव्य प्रतिकृतीने मिरवणुकीची विशेष रंगत वाढवली. ‘हारे का सहारा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या खाटूश्यामजींच्या मंदिराचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.
लेझीम-ढोलचा ठेका अन् तरुणाईचा जल्लोष
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिलांनी सादर केलेल्या लेझीम खेळाने उपस्थितांची दाद मिळवली. सूर्योदय मंडळाच्या ढोल पथकानेही दमदार वादन करून वातावरणात उत्साह निर्माण केला. विविध मंडळांनी सादर केलेले शक्तिप्रयोगाचे थरारक खेळ, पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.
अनेक मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
मिरवणुकीत घोंगडे वस्ती प्रतिष्ठान, जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, जे.पी. कंपनी, जे.एम. संघटना, आर्या टू डान्स ग्रुप, कर्ण साम्राज्य, एमटीएम बॉईज, बजरंग सेना, माधवनगर लेझीम संघ, जय मार्कंडेय सामाजिक संस्था मित्र मंडळ, जय मार्कंडेय बहुउद्देशीय संस्था, न्यू सुनीलनगर मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ आदी मंडळांनी सहभाग घेतला.
या मार्गावरून मिरवणूक
विजापूर वेस, भारतीय चौक, भवानी मंदिर, रत्न मारुती मंदिर रोड, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, आंध्र दत्त चौक, मार्कंडेय सोलापूर रुग्णालय, भद्रावती पेठ, जोडबसवण्णा चौक, मार्कंडेय चौक, राजेंद्र चौक, भुलाबाई चौक, नेताजीनगर, जोडभावी पेठ, कन्ना चौक, औद्योगिक बँक, साखर पेठ, सोमवार पेठ, समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे पुन्हा मार्कंडेय मंदिर असा मिरवणुकीचा मार्ग होता.


पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, सत्यनारायण गुर्रम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, रमेश कैरमकोंडा, विश्वस्त मुरलीधर आरकाल, रामचंद्र जन्नू, अंबादास बिंगी, राजमहेंद्र कमटम, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष अॅड. हेमंतकुमार साका, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, अशोक इंदापुरे, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, विजयालक्ष्मी कुरी आदी उपस्थित होते.