सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय; ३६५ मतांच्या आघाडीने राजेंद्र राऊत विजयी
‘निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला; काहींच्या अहंकारामुळे लढत झाली’ – राजेंद्र राऊतांचा अप्रत्यक्ष टोला
सोलापूर व्हिजन,
सोलापूर, दि. २२ जून
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर तब्बल ३६५ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. या निकालाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीचे संख्याबळ आणि राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



मतमोजणीत राजेंद्र राऊत यांना ४८३ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना केवळ ११८ मते मिळाली. या निवडणुकीत १३ मते अवैध ठरली. निकाल जाहीर होताच भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा उत्सव साजरा केला.
निवडणुकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेंद्र राऊत यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र काही नेत्यांच्या अहंकारी भूमिकेमुळे निवडणूक लढवावी लागल्याचा दावा त्यांनी केला.
“एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुढे करून राजकीय प्रतिष्ठेची लढाई उभी करण्यात आली. जर एवढाच आत्मविश्वास आणि खुमखुमी होती, तर स्वतःच्या घरातील उमेदवार मैदानात उतरवायला हवा होता. वसंतराव देशमुखांना ११८ मते मिळाली, मात्र घरातील उमेदवार असता तर तेवढी मतेही मिळाली नसती,” असा टोला त्यांनी नाव न घेता मोहिते-पाटील गटाला लगावला.
या विजयामुळे सोलापूर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुसंख्य प्रतिनिधींनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट झाल्याने महायुतीची संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, विधानमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर अकलूज येथे भव्य विजयी सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही राजेंद्र राऊत यांनी दिली. या सभेत कार्यकर्त्यांचे आभार मानत पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
मतमोजणीचा निकाल
राजेंद्र राऊत (भाजप) : ४८३ मते
वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) : ११८ मते
विजयाची आघाडी : ३६५
मते
अवैध मते : १३