‘२०२९ ची तयारी ठेवा, शहर मध्य मतदारसंघात आलोच!’; मनिष काळजे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकाची चर्चा…

गोटू बॉस गायकवाड यांचा सूचक संदेश; सामाजिक आणि राजकीय कार्यातून काळजे यांनी निर्माण केले स्वतंत्र स्थान
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.११ नोव्हेंबर
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून सर्वसामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शिवसेनेचे मनिष आण्णा काळजे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोटू (बॉस) गायकवाड यांच्या वतीने लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाने मात्र राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले आहे.

‘आमचा स्वाभिमान’ अशा शब्दांत मनिष काळजे यांचा उल्लेख करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कामकाजामुळे नागरिकांशी निर्माण झालेला संपर्क, कार्यकर्त्यांमधील जिव्हाळा आणि सार्वजनिक जीवनातील सक्रियता यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून व्यक्त होणाऱ्या शुभेच्छांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या शुभेच्छा फलकावरील ‘२०२९ ची तयारी ठेवा, आलोच… शहर मध्य!’ या संदेशाने राजकीय चर्चेला नवा विषय दिला आहे. आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर मध्य मतदारसंघाचा उल्लेख करण्यात आल्याने या संदेशाचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. हा संदेश आगामी राजकीय वाटचालीचा संकेत आहे की समर्थकांकडून व्यक्त करण्यात आलेली अपेक्षा, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गोटू बॉस गायकवाड यांच्यासह दहशत ग्रुप, जय मातंग प्रतिष्ठान आणि एम.एम. कंपनी यांच्या वतीने काळजे यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
एकीकडे सामाजिक कार्यातून जनसंपर्क आणि दुसरीकडे राजकीय क्षेत्रातील सक्रियता, अशा पार्श्वभूमीवर मनिष काळजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झळकलेला हा फलक केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता २०२९ च्या शहर मध्यच्या राजकीय चर्चेला स्पर्श करणारा ठरला आहे.