बेंगळुरू-मुंबई ‘वंदे भारत स्लीपर’चे सोलापुरमध्ये उत्साहात स्वागत; महाराष्ट्रातील पहिला थांबा घेत गाडी मुंबईकडे रवाना
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२ नोव्हेंबर
सोलापूर कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणाऱ्या पहिल्या अत्याधुनिक ‘वंदे भारत स्लीपर’ एक्स्प्रेसचे रविवारी रात्री सोलापूर रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिला थांबा असलेल्या सोलापुरात अवघ्या पाच मिनिटांचा विसावा घेऊन ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू येथून या विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला होता.

सोलापूर रेल्वे स्थानकावर रात्री १० वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही भगव्या-राखाडी रंगातील १६ वातानुकूलित डब्यांची अत्याधुनिक गाडी दाखल होताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. यावेळी आयोजित विशेष स्वागत समारंभास राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्यासह मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे
मंडल रेल प्रबंधक डॉ. सुजित मिश्रा, कार्मिक विभाग प्रमुख योगेश पाटील आदी उपस्थित होते. स्थानकावर उपस्थित सर्व मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
सोलापूरकरांसाठी बंगळुरू_
मुंबईचा प्रवास वेगवान…
सोलापूरहून निघून सकाळी थेट मुंबई अथवा बेंगळुरूत दाखल होता येणार असल्याने आयटी व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
उद्घाटनानंतर ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार असून २ नोव्हेंबरपासून तिची नियमित सेवा सुरू होत आहे. मुंबईहून बेंगळुरूकडे जाणारी गाडी क्रमांक २७६५१ मंगळवार वगळता दररोज रात्री ८.१० वाजता मुंबईहून सुटेल आणि सोलापूर स्थानकावर मध्यरात्रीनंतर पहाटे ३.०० वाजता पोहोचेल, तर सकाळी ११.५५ वाजता बंगळुरूला दाखल होईल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक २७६५२ सोमवार वगळता दररोज बेंगळुरूहून सायंकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि पहाटे ४.२० वाजता सोलापूरला पोहोचून सकाळी ११.५५ वाजता मुंबईत दाखल होईल.
या प्रवासासाठी सोलापूर ते मुंबई दरम्यान थ्री-टियरसाठी १,१५० रुपये, टू-टियरसाठी १,४८५ रुपये आणि प्रथम श्रेणीसाठी १,८२० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. तर सोलापूर ते बेंगळुरू प्रवासासाठी थ्री-टियरचे भाडे १,६७५ रुपये, टू-टियरसाठी २,१६५ रुपये आणि प्रथम श्रेणीसाठी २,६५० रुपये आकारले जाणार आहे. या सेवेमुळे सोलापूरसह शेजारील धाराशिव आणि लातूर परिसरातील प्रवाशांनाही चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
#VandeBharat
#CMOMaharashtra #EknathShinde