‘चला, शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाची विशेष कार्यशाळा

चला, शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाची विशेष कार्यशाळा

सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि. ११ सप्टेंबर 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ५ सप्टेंबर २०२६ पासून राबविण्यात येत असलेल्या ‘चला, शाळेत जाऊया’ या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोलापूर जिल्ह्यात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर येथे ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

 

शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यातील शाळांच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीहिताच्या विविध बाबी तसेच PAT, PGI, SDG, ADP & ABP, U-DISE+, निपुण महाराष्ट्र व परख सर्वेक्षण आदी निर्देशांकांच्या अनुषंगाने शाळांची सद्यस्थिती आणि आवश्यक सुधारणा यांचा आढावा घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यशाळेस राज्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर, शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे डॉ. गणपत मोरे, एससीआरटी उपसंचालक तथा प्राचार्य, डायट डॉ. इब्राहिम नदाफ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. सचिन जक्ताप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. विशाल मुळे तसेच शिक्षणाधिकारी (योजना) श्री. सुमित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. महेश पालकर यांनी शाळांमधील उपलब्ध भौतिक सुविधांचा आढावा, शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती, PGI मधील विविध निर्देशक तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDG) पूर्ततेसाठी शाळांची जबाबदारी यांचा सविस्तर ऊहापोह केला. शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृहे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, संरक्षक भिंत, हँडवॉश स्टेशन, वर्गखोल्या, वीज, पंखे, विज्ञान प्रयोगशाळा, ICT सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना याकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

 

डॉ. गणपत मोरे यांनी शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय यंत्रणांनी सातत्याने शाळांना भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सजग व सक्रिय राहावे, असे आवाहन केले. शाळांना केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या शैक्षणिक गरजा समजून घेऊन आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्यावर त्यांनी भर दिला.

 

डॉ. इब्राहिम नदाफ यांनी PGI, PARAKH (परख), PAT तसेच इतर शैक्षणिक निर्देशांकांचे विश्लेषण करून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विभाग व त्याअंतर्गत असलेल्या शाळांनी भविष्यात कोणत्या दिशेने पावले टाकणे आवश्यक आहे, याबाबत समन्वयात्मक व कृतीशील मार्गदर्शन केले. उपलब्ध आकडेवारीचे केवळ संकलन न करता त्याच्या आधारे शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी ठोस नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.

 

शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शाळांच्या भौतिक सुविधांतील कमतरता दूर करण्यासाठी उपलब्ध विविध शासकीय योजना व निधीचा योग्य पद्धतीने वापर करून प्रस्ताव सादर करणे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच शैक्षणिक गुणवत्तेशी संबंधित निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थानिक पातळीवर कृती आराखडा तयार करण्यावरही कार्यशाळेत भर देण्यात आला.

या कार्यशाळेस सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘चला, शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शाळा अधिक गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, सुविधायुक्त व विद्यार्थी-केंद्रित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

“शाळेची गुणवत्ता ही केवळ एका अधिकाऱ्याची किंवा एका शिक्षकाची जबाबदारी नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे,” या भावनेतून सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *