गोकुळच्या निकालाने महाविकास आघाडीला बूस्ट; भाजपची डोकेदुखी वाढली!
मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची फौज उतरूनही भाजपला अपेक्षित यश नाही; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२० ऑक्टोबर
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने सत्ता कायम राखत विजय मिळवला. या निकालामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भाजपच्या राजकीय रणनीतीसमोर नवे आव्हान उभे राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, तीन कॅबिनेट मंत्री, खासदार आणि आमदारांची मोठी फौज मैदानात उतरूनही भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे गोकुळच्या निकालाचे राजकीय पडसाद आता पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला लक्ष्य केले आहे. आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी विजयाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट करत भाजपला टोले लगावले. ‘एकटा लढला, एकटा भिडला आणि कांडका पाडला’ अशा आशयाच्या प्रतिक्रियांमुळे सतेज पाटील यांच्या विजयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निकालाने विरोधकांना सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी नवी संधी मिळाल्याचे चित्र आहे.
पदवीधर, शिक्षक निवडणुकीत विजयाची पुनरावृत्ती होणार?
गोकुळच्या निकालाचा प्रभाव पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीकडून पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव, तर शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला गोकुळच्या निकालामुळे बळ मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेषतः कोल्हापूर परिसरात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हर्षदा देशमुख-जाधव यांना सुमारे दहा हजार, तर प्रा. जयंत आसगावकर यांना तीन ते चार हजार मतांची आघाडी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानात या अंदाजांचे प्रतिबिंब कितपत उमटते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
भाजपसमोर डॅमेज कंट्रोलचे आव्हान
गोकुळच्या विजयानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते नव्या जोमाने प्रचारात सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावरील विजयाच्या पोस्ट, राजकीय टोलेबाजी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह यामुळे विरोधकांचे मनोबल वाढले आहे. दुसरीकडे, भाजपला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपली संघटनात्मक ताकद अधिक प्रभावीपणे वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
गोकुळचा निकाल हा स्थानिक सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांचा परिणाम असला, तरी त्यातून निर्माण झालेला राजकीय संदेश महत्त्वाचा ठरू शकतो. या निकालाचा फायदा मतदारांपर्यंत पोहोचवण्यात महाविकास आघाडी कितपत यशस्वी होते आणि संभाव्य राजकीय नुकसान टाळण्यासाठी भाजप कोणती रणनीती आखते, यावर आगामी निवडणुकीतील वातावरणाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे गोकुळचा बूस्ट महाविकास आघाडीला किती मतांमध्ये रूपांतरित करता येतो, हीच आता खरी कसोटी ठरणार आहे.