बदलाचा वखुत जवळ आला का ? गोकुळचा बूस्ट, भाजपची डोकेदुखी वाढली

बदलाचा वखुत जवळ आला का ? गोकुळचा बूस्ट, भाजपची डोकेदुखी वाढली

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२० ऑक्टोबर

मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, तीन कॅबिनेट मंत्री, खासदार आणि आमदारांची मोठी फौज मैदानात उतरूनही गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीनं विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली. हा निकाल भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. तर दुसरीकडं महाविकास आघाडीतील नेत्यांचा उत्साह मात्र चांगलाच वाढल्याच पहायला मिळतयं.

गोकुळच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपला टोले लगावले आहेत. आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी ‘एकटा लढला, एकटा भिडला आणि कांडका पाडला’ अशा आशयाच्या पोस्ट केल्या आहेत. त्यामुळं पाटलांच्या विजयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

गोकुळच्या निकालाचा परिणाम आता पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही पाहायला मिळू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांना मैदानात उतरवलं आहे. अशा परिस्थितीत गोकुळच्या निकालामुळं भाजपची डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे.

 

गोकुळच्या विजयामुळं महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागल्याचं दिसत आहे. काल रात्रीपासूनच सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोस्टचा धडाका सुरू झाला आहे. तर दुसरीकडं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते काहीसे बॅकफूटवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

राजकीय अभ्यासकांच्या मते, गोकुळच्या निकालामुळं कोल्हापूर परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं. हर्षदा देशमुख-जाधव यांना 10 हजार आणि प्रा. जयंत आसगावकर यांना कोल्हापूर परिसरातून तीन ते चार हजार मतांची आघाडी मिळू शकते, असं म्हटलं जात आहे.

 

गोकुळच्या विजयानं महाविकास आघाडीला मिळालेला हा बूस्ट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते किती ताकद लावतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडं गोकुळच्या निकालानंतर भाजप कोणती रणनीती आखते आणि संभाव्य राजकीय नुकसान रोखण्यासाठी काय डॅमेज कंट्रोल करते, याकडंही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *