डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा नवा आदर्श; गॅस्ट्रो शिबिरातून शेकडो नागरिकांना दिलासा
मोफत आरोग्य शिबिरातून सर्वसामान्यांना आधार; आरोग्य जनजागृतीची प्रभावी पायरी – महापौर विनायक कोंडयाल
लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे

सोलापूर व्हिजन न्युज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या वतीने पोट, आतडे, लिव्हर व पचनसंस्थेशी संबंधित आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे प्रभावी आयोजन करण्यात आले मार्कंडेय रुग्णालयातील ओपीडी हॉल येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, संचालक डॉ. विजयकुमार आरकाल, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, रायेशम येमुल, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, कमटम सर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, किसन श्रीराम, डॉ. श्रीकांत माकम, डॉ. अभिजीत चिंचोली आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच श्री मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली या संपूर्ण शिबिराचे प्रमुख संयोजन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ञ डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी पुढाकार घेऊन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांची तपासणी करून दर्जेदार आरोग्य सेवा पुरवली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून विशेष कौतुक केले. प्रास्ताविकात डॉ. कोठे यांनी सांगितले की, यकृत व पचनसंस्थेचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले गेले तर गंभीर गुंतागुंत टाळता येते. त्यामुळे वेळेवर निदान आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. या शिबिरामध्ये एंडोस्कोपी तपासणीवर ५०% सवलत देण्यात आली, तसेच फायब्रोस्कॅन, रक्त तपासणी आणि पोट, आतडे व लिव्हरशी संबंधित आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या तपासण्यांमुळे अनेक रुग्णांना त्यांच्या आजारांचे प्रारंभिक निदान होण्यास मदत झाली. महापौर विनायक कोंडयाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मोफत आरोग्य शिबिर ही आजच्या काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच, रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी भविष्यात सर्व विभागांच्या माध्यमातून अशा मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला. या शिबिरात डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी आणि फायब्रोस्कॅन या तपासण्या मोफत करण्यात आल्या.यांच्याकडून एकूणच, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे मोफत गॅस्ट्रो शिबिर केवळ उपचारापुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा या संकल्पनेला बळकटी देणारे ठरले. डॉ. सूर्यप्रकाश कोठे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पुढाकारामुळे सोलापूरमध्ये आरोग्यसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.