मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सुविधांवर वारकरी समाधानी  

मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी

सोलापूर व्हिजन | पंढरपूर, दि. १९ जुलै

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राज विभागाने पुरवलेल्या सोयी-सुविधांमुळे वारकरी समाधानी झाले आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन सुविधांची पाहणी केली व संस्थानचे विश्वस्त, सोहळा प्रमुख आणि वारकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

जमिनीवर बसून घेतला प्रसाद

मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न ठेवता पालकमंत्री गोरे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर वारकऱ्यांसमवेत पायी चालत कारुंडे बंगला येथील माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन सोहळा प्रमुखांची भेट घेतली. सोहळा प्रमुखांसमवेत जमिनीवर मांडी घालून वारकऱ्यांसोबत प्रसाद घेतला व कार्यालयातही जमिनीवर बसून सोहळ्यातील सुविधांबाबत चर्चा केली.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी संस्थानच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे महावस्त्र व प्रसाद देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मराठी चित्रपट अभिनेते भाऊ कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांचेही सोहळा प्रमुखांच्या वतीने स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी पांढरे व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

वारकऱ्यांना रेनकोट वाटप

ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. सोहळा प्रमुखांना महावस्त्र व रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संतांच्या पालखी मार्गावर ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती सोहळा प्रमुखांना दिली.

पालखी मार्गावर विविध सुविधा

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गासह राज्यातील इतर दहा पालखी मार्गांवर ग्रामविकास विभागामार्फत शौचालय सुविधा, स्नानगृह, मसाज सुविधा, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष (जर्मन हँगर), मुख्यमंत्री आरोग्य रथ, मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांसाठी सहाय्यक म्हणून ‘वारीदूत’ तैनात करण्यात आले आहेत.

आरोग्यदूत, वारीदूत, जलदूतांच्या सेवेमुळे वारकरी समाधानी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री आरोग्यदूत’, ‘मुख्यमंत्री वारीदूत’ व ‘मुख्यमंत्री जलदूत’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. गणवेशातील कर्मचारी आपुलकीने सेवा देत आहेत. आरोग्यदूत मोटारसायकलवरून फिरून वैद्यकीय किटसह वारकऱ्यांना जागेवर उपचार देत आहेत. यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना तातडीने सुविधा मिळत आहेत. आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी स्वतः या सेवेची पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी घाडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी समन्वय ठेवून आहेत. पाणीपुरवठ्यासाठी टँकर चालकांसाठी उपअभियंता नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कार्यकारी अभियंता संतोष काटकर व उपअभियंता रणजित काळे हे पुणे ते पंढरपूर या दोन्ही मार्गांवर नियंत्रण ठेवत आहेत.

 

मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल

पालखी मार्गावर चालून थकलेल्या भाविकांना विसावा मिळावा यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाने मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्राची सोय केली आहे. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण मिळाल्याने वारकरी समाधानी आहेत. हजारो वारकरी येथे आराम करत आहेत. थकलेल्या पायांसाठी मसाज सुविधा व महिलांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध आहे. मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव नियंत्रण करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *