संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन ; जिल्हाधिकारी यांच्यासह सीईओ यांनी केले मनोभावे स्वागत सर्वत्र आनंदाचे वातावरण

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि सीईओ कुशल जैन यांच्या कडून स्वागत

सोलापूर जिल्ह्यात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे भक्तीमय वातावरणात उत्साहाने स्वागत

विठू माऊलीचा गजर करत जेसीबी मधून पालखी सोहळा रथावर पुष्पवृष्टी

पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उप जिल्हाधिकारी उत्तम दिघे यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे पालखीचे सूत्रे सोपवली

अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयात नेत्रदीपक रिंगण सोहळा; हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचीही उपस्थिती  

सोलापूर व्हिजन | पंढरपूर, दि. २० जुलै 

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सराटी- अकलूज येथे सोलापूर जिल्हा प्रवेश करताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी अत्यंत भक्तिभावाने श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन व अश्व पूजन करून स्वागत केले. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, पंचायत समिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, सुमित शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ यांच्यासह सोलापूर- पुणे जिल्ह्यातील अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या सोबत असलेले अश्वचे पूजन केले. त्यानंतर नीरा नदीचा पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यात पालखी रथाचे आगमन होत असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जेसीबी मधून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी भाविक यांनी विठ्ठल नामाचा, तुकाराम महाराजांच्या नाम घोष करून सर्व परिसर भक्तीमय केला.

 

त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला व पालखीचे मोठ्या उत्साहाने व आनंदाने स्वागत केले. तत्पूर्वी पुणे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांनी श्री संत तुकाराम महाराज पालखीची सर्व सूत्रे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे दिली. स्वागताच्या ठिकाणी संध्याताई तिवाडी यांचे व त्यांचे पथक यांचे भारुड गायन झाले.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी केले रथाचे सारथ्य

 

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन व पालखी स्वागत केल्यानंतर महाराजांच्या पालखीचे सारथ्य ही केले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे ही उपस्थित होते.

 

मराठी कलाकारांची उपस्थिती

 

हा स्वागत सोहळा पाहण्यासाठी मराठी चित्रपट व टीव्ही अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री शिवानी परब, संजना काळे उपस्थित होते.

 

वारकऱ्यांसाठी सुविधा

 

पालखी सोहळा स्वागत ठिकाणी वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सोयी-सुविधांची माहिती यावेळी पालखी सोहळा प्रमुखांना देण्यात आली. पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे व निवारा केंद्रांबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आरोग्य विभागाच्या वतीने येथे हिरकणी कक्ष मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्य उपचार केंद्र आदी सुविधा दिलेल्या असून हजारो भाविक या सुविधांचा लाभ घेत होते. तसेच पालखी सोहळ्याबरोबर आरोग्य बाईक ची सुविधा ही देण्यात आली आहे.

 

अकलूज येथे नेत्रदीपक रिंगण

 

दरम्यान, अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या भव्य मैदानावर पालखी सोहळ्यातील पारंपरिक रिंगण सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला. अश्वांनी घातलेल्या रिंगणाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. याच देही, याच डोळा अश्व रिंगण पाहून उपस्थित हजारो अकलूजकर तसेच परिसरातील नागरिक मंत्रमुग्ध झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात व ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. संपूर्ण अकलूज नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *