पंढरपूर आषाढी वारी काळात झेडपी अभियंत्यांच्या रजा बंद ; सतर्क राहण्याच्या उपाध्यक्षांच्या सूचना
सोलापूर व्हिजन
सोलापूर, दि.२४ जून
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सर्व उपअभियंते व कनिष्ठ अभियंत्यांनी कोणत्याही प्रकारची रजा न घेता सतर्क (अलर्ट) मोडवर राहावे आणि वारी मार्गावरील तसेच संबंधित विकासकामांचे नियमित निरीक्षण करून आवश्यक ठिकाणी तत्काळ कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिले.

बुधवारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम समितीचे सभापती पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आषाढी वारीच्या व्यवस्थापनाचा विशेष आढावा घेण्यात आला. लाखो वारकर्यांचे आगमन लक्षात घेता रस्ते, पायाभूत सुविधा आणि वारी मार्गावरील आवश्यक सोयी-सुविधा सुरळीत राहण्यासाठी बांधकाम विभागाने विशेष दक्षता घ्यावी. यावेळी सर्व कनिष्ठ अभियंते आणि उपअभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून रस्त्यांची स्थिती, दुरुस्तीची कामे तसेच इतर आवश्यक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले. वारीदरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्वरित उपाययोजना करून प्रशासनाशी समन्वय साधण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या.
या सभेत बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा, अंगणवाडी बांधकामांची प्रगती, सौर ऊर्जा प्रकल्पांची सद्यस्थिती, वृक्षारोपण मोहिमेची अंमलबजावणी तसेच जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न वाढविण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
या सभेस जिल्हा परिषद सदस्य विकास बुळ्ळा, नेताजी खंडागळे, प्रदीप खांडेकर, सचिन जाधव, अश्विनी चिवटे, अतुल पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अनुभवी अधिकार्यांची मंगळवारी बैठक
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून वारी व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अधिकार्यांची मंगळवार, 30 जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वारी मार्गावरील सुविधा, रस्त्यांची स्थिती, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विविध विभागांमधील समन्वयाचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे बैठकीस उपस्थित राहून आवश्यक सूचना देणार आहेत. वारी काळात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रशासनाची यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावी, यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे