आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषद अप टू डेट ! अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि सीईओंचे मायक्रो प्लॅनिंग वारकऱ्यांच्या सेवेत ‘सुविधांचा महापूर’; ५ हजार शौचालये, २२० टँकर, १३ आरोग्यरथांची व्यवस्था

आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज

वारकऱ्यांच्या सेवेत ‘सुविधांचा महापूर’; ५ हजार शौचालये, २२० टँकर, १३ आरोग्यरथांची व्यवस्था

सोलापूर व्हिजन,

सोलापूर दि.२३ जून

आषाढी वारी २०२६ निमित्त लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा सेवा, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचे व्यापक जाळे उभारले आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुखकर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, यंदाची वारी अधिक सुविधायुक्त आणि वारकरी-केंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी या तयारीची माहिती दिली.

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जिल्ह्यातील ८१ गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. या प्रवासात ३८ मुक्काम, ४३ विसावे आणि ७ रिंगण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य देत तब्बल ५ हजार तात्पुरती व फिरती शौचालये उभारली जाणार आहेत. याशिवाय महिलांसाठी स्वतंत्र ५०० स्नानगृहांची सोय करण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पालखी मार्गावर २२० पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. सर्व पाणी स्रोतांची गुणवत्ता तपासूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे. मुक्कामस्थळी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रांतर्गत २३ जर्मन हँगर आणि ३७ वॉटरप्रूफ मंडप उभारले जाणार असून येथे विश्रांती, ओपीडी सेवा, हिरकणी कक्ष, मोबाईल चार्जिंग आणि पंख्यांची सुविधा उपलब्ध असेल.

वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी १३ ‘मेडिसिन ऑन व्हील’ आरोग्यरथ २४ तास कार्यरत राहतील. तसेच १५८ तात्पुरती आरोग्य केंद्रे, १२१ बाईकस्वार आरोग्यदूत आणि २१ आपत्कालीन आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवांसाठी ४४० वैद्यकीय अधिकारी, ४३५ आरोग्य कर्मचारी आणि २,८२२ आशा सेविका तैनात राहणार आहेत.

याशिवाय ७५० चरणसेवा (फूट मसाजर) यंत्रे, १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन, १६७ हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन तसेच मोफत जल सलून केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, कचरा व्यवस्थापन आणि अन्नसुरक्षा तपासणीसाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.

आषाढी वारी हा केवळ धार्मिक सोहळा नसून लाखो भाविकांच्या व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवत ‘सेवा हीच वारी’ या भावनेतून नियोजन केल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

सुरक्षित सुशिक्षित आणि सुखकर वारीसाठी प्रयत्न 

जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी सदस्य अधिकारी वारीच्या अनुषंगाने कार्यरत आहेत. मोबाईल चार्जिंग व्हॅन, फिरते वैद्यकीय वाहने, महिला सभागृह, हिरकणी कक्ष, उपचार केंद्र अशा सेवा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. वारकऱ्यांना अधिकाधिक दर्जेदार व उपयुक्त सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आहे.

– दीपक वैद्य,अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर 

आषाढी वारीसाठी सर्व नियोजन अंतिम टप्प्यात 

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील ३,७९७ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यामध्ये ४४० तज्ञ वैद्यकीय अधिकारी, ४२५ कर्मचारी त्याचप्रमाणे आशा वर्कर आणि इतर कर्मचारी देखील कार्यरत असणार आहेत. सोलापूर सह इतर जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर्स वारी निमित्ताने सोलापुरात मुक्कामाला असणार आहेत. याशिवाय काही संस्थांकडून सी.आर.एस फंडातून २० लाख औषधे किट प्राप्त केली जाणार आहेत. शासनाकडून वारकऱ्यांसाठी विमा योजना केली जाणार आहे. साधारणपणे ३० ते ३५ लाख वारकरी येण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार वारीचे नियोजन केले आहे.

– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर 

वारीच्या अनुषंगाने सर्व निविदा अंतिम टप्प्यात 

आषाढी वारीच्या अनुषंगाने शासनाकडून एकूण ६३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे डीपीसी मधून एक कोटी प्राप्त झाले आहेत. नियोजित आणि अनियोजित रस्त्यांच्या विकासासाठी अनुक्रमे दीड कोटी आणि साडेतीन कोटीचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये पालखी मार्ग दुरुस्तीचा आढावा घेतला जाणार असून, कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी नियोजन करण्याचा विचार सुरू आहे. आषाढी वारीच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व कामांची निविदा अंतिम टप्प्यात आहे.

– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *