तब्बल २१ हजार बटनमधून साकारली सौंदर्यपूर्ण शिवप्रतिमा !

युवाचित्रकार विपुल मिरजकर यांनी चित्राच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना केले अभिवादन ; अन्नदान करत राबविणार सामाजिक उपक्रम
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१७ फेब्रुवारी
हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (१९) फेब्रुवारी रोजी मोठा उत्साहात साजरी होणार आहे. याच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध चित्रकार विपुल मिरजकर यांनी आपल्या हस्त कौशल्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सौंदर्यपूर्ण अशी प्रतिमा साकारलेली आहे. सुमारे २१ हजार शर्टाच्या बटनच्या साह्याने सदरची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मिरजकर यांनी या वैविध्यपूर्ण अशा प्रतिकृतीच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे.
दरम्यान, यापूर्वी मिरजकर यांनी बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे इतर थोर महापुरुषांच्या प्रतिमा रांगोळी, खिळे, दोरा, तिळगुळ लाह्या यांच्या सहाय्याने विविध प्रकारे साकारल्या आहेत. मिरजकर यांचा यामध्ये विशेष हातखंडा असून, प्रत्येक प्रतिमा तयार करण्यामागे त्यांचा सागरात्मक उद्देश दिसून येतो. यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली जात आहे. प्लायवूडवर प्रतिमा साकारून आकर्षक रंगछटा व चेहऱ्याच्या लकेरनुसार प्रतिमा साकारली जात आहे. हुबेहूब प्रतिमा दिसावी यासाठी विविध रंगी बटन वापरले गेले आहेत. बटनच्या माध्यमातून अशी प्रतिमा साकारले जाऊ शकते, असा विचार त्यांच्या डोक्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिमा साकारली आहे. सदरची प्रतिमा शिवजयंती मिरवणुकी दरम्यान श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यंदाच्या शिवजयंतीनिमित्त देखील असाच उद्देश समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांची वैविध्यपूर्ण अशी प्रतिकृती साकारली आहे. सदरची प्रतिकृती बनवण्यासाठी मिरजकर यांना तब्बल चार दिवसांचा कालावधी लागला आहे. त्याच पद्धतीने विविध रंगाचे बटन उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांना बसवराज कडगंची आणि पंकज शहा यांचे सहकार्य लाभले आहे.
सदरच्या प्रतिमा विक्री केल्यानंतर त्यातून जे काही उत्पन्न प्राप्त होईल त्यातून देखील अन्नदान करण्याचा सामाजिक उपक्रम मिरजकर यांनी हाती घेतला असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हस्त कौशल्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम
हस्तकौशल्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे चित्र, प्रतिमा, प्रतिकृती साकारल्या जातात. काही विशेष चित्र साकारण्यासाठी ऑर्डर प्राप्त होते. त्यातून जे उत्पन्न मिळते. त्यातून अन्नदाना सारखा सामाजिक उपक्रम हाती घेतला जात आहे. शिवजयंती निमित्त साकारलेल्या या शिवप्रतिमा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादक ठरणार आहेत. तसेच त्यातून जे काही उत्पन्न प्राप्त होईल त्यातून अन्नदान तसेच विविध सामाजिक कार्य केले जाणार आहे.
– विपुल मिरजकर, चित्रकार