महाविकास आघाडीतून काँग्रेसने माकपला जागा सोडावी? अन्यथा ; परिणाम भोगावे लागणार…माने यांच्यानंतर आडम मास्तरांनी शिंदे फॅमिलीला घेतले फैलावर.
मास्तरांनी काँग्रेसला दिला सज्जड इशारा !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३१ ऑक्टोंबर – होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळत माकप पक्षाला जागा द्यावी अशी, मागणी लोकसभा निवडणुकी दरम्यान विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी काँग्रेसकडे केली होती. तेव्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आघाडीतून माकपला मध्य विधानसभा जागा देण्याचा शब्द दिला होता. परंतु ऐनवेळी काँग्रेसने आघाडीचा धर्म न पाळता चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली. अचानकपणे झालेल्या या सर्व राजकीय घडामोडींमुळे आडम मास्तर आणि माकप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आडम मास्तर यांनी काँग्रेसला तर पर्यायाने खा.प्रणिती शिंदे यांना गर्भगळीत इशारा देत, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच (दी.४) नोव्हेंबर रोजी आपला अर्ज मागे घ्यावा अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल, दिवाळीत तुम्ही बॉम्ब फोडला, दिवाळीनंतर आम्ही बॉम्ब फोडू असा सज्जड इशारा दिला आहे.
दरम्यान आडम मास्तर पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे हरियाणा होऊ देऊ नका, हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ नका, महाविकास आघाडीने संयुक्तपणे निवडणूक लढवावी आणि भाजपला खऱ्या अर्थाने टक्कर द्यावी. डावेपक्ष जरी संख्येने कमी असतील मात्र ते प्रामाणिक व क्रांतीकारक आहेत. त्यामुळे त्यांचा उठाव हा परिणामकारक असतो. त्यामुळे महाविकास आघाडीने शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात भरलेला काँग्रेसचा अर्ज मागे घ्यावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असे सांगतानाच शहर मध्ये विधानसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमीपासून माकप पक्षाचा आहे. यापूर्वी या मतदारसंघातून मी तीन वेळा विधानसभेवर निवडून गेलो आहे. १९९५, २००० आणि २००४ या कालावधीत आमदार म्हणून मतदारसंघाचे कामकाज पाहिलेले आहे. त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. यासर्व गोष्टींचा लेखाजोखा मी (दी.५) नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या जाहीर सभेत मांडणार आहे. त्यामुळे काँग्रेसने वरिष्ठ पातळीवर तसेच स्थानिक पातळीवर या गोष्टीचा विचार करावा आणि निर्णय बदलावा. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. यापत्रकार परिषदेस पक्षाचे जिल्हा सचिव एम.एच.शेख, युसुफ मेजर शेख, नसीमा शेख, शेवंता देशमुख, नलिनी करबुर्गी, अनिल वासम, सुनंदा बल्ला आदींची उपस्थिती होती.
वरिष्ठ पातळीवर वाटाघाटी सुरू.
काँग्रेसच्या या राजकीय डावपेचांमुळे स्थानिक पातळीवरील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवर वाटाघाटी सुरू झाले आहेत. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सिताराम येचुरी यांनी सोनिया गांधी यांच्याशी याबाबत बातचीत केली होती. मात्र येचुरी यांना देवाज्ञा झाली, आणि आमची बाजू कमजोर पडली. परंतु माकप हा खचणारा पक्ष नाही, जरी महाविकास आघाडीने आघाडीचा धर्म पाळला नाही, तर होऊ घातलेल्या निवडणुकीत विविध बॉम्बस्फोटाला सामोरे जावे लागणार आहे.