आडम मास्तरांचा होणार पत्ता ओपन ! दिल्लीत खलबतं झाली सुरू…

आडम मास्तरांचा होणार पत्ता ओपन ! दिल्लीतील बैठकीकडे लागले लक्ष…?

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. ७ ऑक्टोंबर – आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. सोलापूर शहरातील विद्यमान तसेच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गॉडफादरकडे सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूर शहरातील शहर मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडे आता सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः शहर मध्य मतदार संघातून तीनवेळा विधानसभेत निवडून गेलेल्या आ.प्रणिती शिंदे यांचा प्रवास आता दिल्लीकडे सुरू झाल्यानंतर त्यांच्या पश्चात आता शहर मध्य विधानसभेचा यापुढे वारस कोण असणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.

       दरम्यान कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे आडम मास्तरांनी तर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शहर मध्य साठी आपले नाव फिक्स करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र नंतर काँग्रेस पक्षांतर्गत या गोष्टीला विरोध वाढत गेला. आपली जागा त्यांना का द्यायची ? असे प्रश्न निर्माण केल्यांनतर आडम मास्तरांची डोकेदुखी वाढली आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढत चाललेली आहे. त्यामुळे आडम मास्तर यांनी लागलीच गल्ली ते दिल्लीपर्यंत मजल मारत वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी चंग बांधलेला दिसत आहे.

    दरम्यान यापूर्वी देखील त्यांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेऊन चर्चा विनिमय केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये देखील याबाबत बैठक घेऊन मर्जी संपादन केल्याचे दिसून आले. सध्या दिल्लीमध्ये या संदर्भात बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीनंतरच आडम मास्तर आपला पुढचा पत्ता ओपन करणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी धुमश्चक्री पहावयास मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आजच्या दिल्लीतील बैठकीकडे लागले लक्ष ! 

काँग्रेस पार्टीचे खा.राहुल गांधी यांच्या सोबत माकपचे ज्येष्ठ नेते यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस दोन्ही पार्टीचे जेष्ठ नेते उपस्थित असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत नेमक्या कोणत्या घडमोडी होतात त्यावर अडम मास्तर यांच्या विधानसभेचे पुढचे गणित असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *