मनोहर सपाटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अखेर निकाली ; फिर्यादीच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद ठरला मोक्याचा क्षण
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर / प्रतिनिधी
पुण्यातील एका महिलेवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज बुधवार ( दि.१६) रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.वी.केंद्रे यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत फिर्यादीतर्फे अँड बी.एन. भडंगे, अँड.एन.एन.भडंगे आणि अँड.योगेश पवार यांनी मनोहर सपाटे यांच्यावरील गंभीर गुन्ह्यांची यादी न्यायालयात सादर करत सपाटे यांना जामीन मंजूर करू नये, असा जोरदार युक्तिवाद केला. फौजदार चावडी पोलिसांनी मनोहर सपाटे यांना नोटीस दिल्यामुळे आणि मूळ फिर्यादी तर्फे होणाऱ्या सक्त विरोधामुळे अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता धूसर वाटत असल्यामुळे मनोहर सपाटे यांनी स्वतःच आपला जामीन अर्ज काढून घेतल्याचे फिर्यादचे वकील अँड. योगेश पवार यांनी सांगितले आहे.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यांनतर माजी महापौर मनोहर सपाटे यांना जामीन देऊ नये, यासाठी फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयासमोर त्यांच्याच मुलाने म्हणजे चिंतामणी मनोहर सपाटे यांनी (सन २०२४) रोजी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत न्यायालयात सादर केली होती. त्याचप्रमाणे सपाटे यांच्यावर दाखल असलेले यापूर्वीचे २० गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची यादी देखील यापूर्वीच फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात सादर केली होती. सपाटे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे पोलीस मनोहर सपाटे यांना अटक करणार का?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे अँड बी.एन. भडंगे, अँड.एन.एन.भडंगे आणि अँड. योगेश पवार तर आरोपी तर्फे अँड. शशी कुलकर्णी, यांनी काम पाहिले.
पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्याची सहमती..
ज्या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्या कलमान्वये आरोपींना अटक करण्याची तरतूद कायद्यात नाही. अटक होण्याच्या कारणाने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. परंतु पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्याची सहमती दर्शवल्याने अटक होण्याची शक्यता नसल्याने जमीन अर्ज मागे घेतला आहे. याप्रकरणासंबंधी आज गुरुवारी न्यायालयात पुढील आदेश देण्यात येतील.
अँड. शशी कुलकर्णी, प्रसिद्ध विधीज्ञ तथा संशयित मनोहर सपाटे यांचे वकील
अटकपूर्व जामीन अर्जाची गरजच नव्हती…
सर्व प्रथम घटना घडल्यानंतर फौजदार चावडी पोलिसांनी मनोहर सपाटे यांना नोटीस देऊन सोडून दिले. जर पोलिसांना सपाटे यांना अटकच करायची होती. तर ती तेंव्हाच त्याचदिवशी झाली असती. नोटीस बजावल्यानंतर सपाटे यांना अटक करण्याचा पोलिसांचा इरादा नव्हता. त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची गरजच नव्हती. वास्तविक पाहता सात वर्षांच्या आतील शिक्षेसाठी अटक न करण्याचा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे या निकालाच्या आधारे अटक होण्याची शक्यता नाही. यानंतर पोलिस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतील. न्यायालयात केस सुरू होईल.
– अँड. धनंजय माने, ज्येष्ठ विधीज्ञ जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर
जिल्हा न्यायालयाचा आजचा आदेश काय म्हणतो…
पुण्यातील एका महिलेवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर आज गुरूवार ( दि.१७) जुलै रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.वी.केंद्रे यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज निकाली काढला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी मनोहर सपाटे यांस नोटीस दिली होती. त्यामुळे सपाटे यांस अटक होण्याची शक्यता नसल्यामुळे आरोपी मनोहर सपाटे यांनी जामीन अर्ज काढून घेण्यासाठी कोर्टाकडे विनंती केली होती. त्यावर न्यायालयाने संशयित मनोहर सपाटे यांनी न्यायालयासमोर सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज काढून घेण्याची विनंती मान्य करून मनोहर सपाटे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज विना कारवाई काढून टाकला. यांत आरोपीतर्फे शशी कुलकर्णी तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. डी. एन. भडंगे, ॲड. एन. एन. भडंगे व ॲड. योगेश पवार यांनी काम पाहिले.
माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवार ( दि.१६) जुलै रोजी सुनावणी घेण्यात आली होती. आपल्याला अटक होण्याची भीती नसल्याचे कारण पुढे करत मनोहर सपाटे यांनी अँड शशी कुलकर्णी यांच्यामार्फत आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत असल्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत निकाली काढत असल्याचे आदेश दिल्याचे आरोपीचे वकील अँड शशी कुलकर्णी यांनी सांगितले.