महिलांच्या अर्थाजनाचे साधन ” ई पिंक रिक्षा “

महिलांच्या अर्थाजनाचे साधन ” ई पिंक रिक्षा “

महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाचा नवोपक्रम ; अंगणवाडीच्या माध्यमातून शहरात होतोय प्रसार आणि प्रचार…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.८ डिसेंबर

राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच, महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना नरोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” ही योजना राज्यात सुरु करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

ई पिंक रिक्षाचे स्वागत करताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे, तसेच अंगणवाडी बीट मुख्य सेविका रोहिणी निर्मळे आदींसह सेविका मदतनीस आणि लाभार्थी महिला..

                दरम्यान, त्या अनुषंगाने सोलापूर शहरी भागात महिलांना स्वयंरोजगार यामधून अर्थार्जन करण्यासाठी व  महिलांना संरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी सदरच्या योजनेतून महिला व बालविकास कार्यालयाकडून योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी बालविकास प्रकल्प शहर पश्चिम कुचन नगर बीट अंतर्गत सर्व अंगणवाडी क्षेत्रात दररोज गुलाबी अर्थात पिंक ई – रिक्षा याबाबत महिलांना आणि नागरिकांना जनजागृती प्रसार व प्रचार केला जात आहे. त्या अनुषंगाने आज शहरी भागात पिंक ई – रिक्षा प्रचार करण्यात आला. त्याचे उद्घाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे, तसेच अंगणवाडी बीट मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांच्या उपस्थितीत गुलाब पुष्प उधळून करण्यात आले. तदनंतर महिलांना या इ रिक्षा संदर्भात इत्यंभूत माहिती देण्यात आली. यावेळी महिलांनी रिक्षा हाताळून पाहिली.

                 दरम्यान, आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये सदर योजनेसाठी प्रसिध्द केलेल्या ई-निविदेच्या अनुषंगाने प्री-बीड बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार संदर्भ क्र.१ येथील दि.०८.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्या अनुषंगाने दिनांक ३.९.२०२४ रोजी  मंत्री (महिला व बाल विकास) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर शासन निर्णयात सुधारणा करून दि.१३.०९.२०२४ रोजी शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थी महिलांना सदरची रिक्षा ३ लाख ८६ हजार रुपयांत प्राप्त होणार आहे. सदर योजनेतून महिलांना सवलत मिळणार आहे. योजनेच्या स्वरूपामधून लाभार्थी महिलांनी ई रिक्षासाठी १० टक्के वाटा हिश्यापोटी भरावयाचा आहे. तर २० टक्के वाटा जिल्हा सोलापूर महिला व बालविकास अधिकारी कार्यालय भरणार आहे. तर ७० टक्के रक्कम बँकेद्वारे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. असे एकूण ३.८६ लाख निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ई पिंक रिक्षासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता.

ई पिंक रिक्षाची निर्मिती कंपनी कायनेटिक यांच्या मध्यामतून महिलांना लायसन्स, परमिट, बॅच बिल्ला, प्रशिक्षण, दिले जाणार आहे. त्यासाठी वय वर्ष २० ते ४० वयोगटातील महिला असणे आवश्यक आहे. तसेच त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, पॅन कार्ड मतदान कार्ड केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे. ज्या लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल त्यांना पंधरा वर्षाखालचा ओळखपत्र पुरावा म्हणजेच मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच उत्पन्न दाखला नसेल तर पंधरा वर्षाखालचे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे.

दीपक ढेपे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सोलापूर नागरी. 

सोलापूर जिल्ह्यासाठी ६०० ई पिंक रिक्षाचे उद्दिष्ट 

या योजनेसाठी आतापर्यंत १९० लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार ८६ अर्जांना जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच १०३ अर्ज प्रक्रियेमध्ये असून त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ६०० पिंक ई रिक्षा वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

रमेश काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.

ई पिंक रिक्षाचे ११५ अंगणवाडी क्षेत्रात प्रचार 

शहरातील विविध अंगणवाडी क्षेत्रामध्ये दररोज ई पिंक रीक्षाचे प्रचार केले जाते. महिला वर्गातून सदरच्या इ पिंक रिक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही देखील अर्ज देतो असे महिलांकडून सांगण्यात येते. शहर पश्चिम कुचन नगर बीट अंतर्गत ११५ अंगणवाडी क्षेत्रात प्रचार केला जात आहे. कोणापुरे चाळ ते कुमठे गावापर्यंत प्रसार केला आहे.

रोहिणी निर्मळे, अंगणवाडी बीट मुख्य सेविका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *