रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा; अन्यथा महापालिकेत एमजेपीचा अधिकारी नेमणार…

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी धरले महापालिका प्रशासनाला धारे

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.९ डिसेंबर
सोलापूर शहरातील नेहमीचीच ओरड असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर सोलापुरातील नेते पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे महापालिका प्रशासनावर चांगलेच भडकले. शहराचा रात्रीचा पाणीपुरवठा तातडीने बंद न केल्यास महापालिकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा (एमजेपी) अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी आयोजित बैठकीतून दिला.


नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे यादरम्यान विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिका अधिकाऱ्यांशीही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून पाणीपुरवठा आणि शासनाच्या विविध योजना आणि निधी संदर्भातील कार्यवाहीचे निर्देश दिले. रात्रीच्या पाणीपुरवठ्यामुळे माझ्या प्रभागातील दोघांचा बळी गेल्याचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, किसन जाधव, आणि माजी गटनेते तौफिक शेख यांनीही शहरातील विविध विषयांवर समस्या मांडून काम न करणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. अनेक भागांमध्ये रात्री अपरात्री होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे शहरातील महिला आणि नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतानाच तक्रारी देखील वाढल्या आहेत. सोलापूरचा रात्रीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करावा असे निर्देश ना. बनसोडे यांनी आयुक्त डॉ. ओम्बासे यांना दिले. तसेच रात्रीचा पाणीपुरवठा बंद होऊन सुरळीत होणार असेल तर सोलापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे देण्याचा विचार करणार नाही असेही स्पष्टीकरण केले.
अधिवेशनानंतर लागू होणार आचारसंहिता
महापालिका निवडणुकांची वेगाने राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली आहे. रखडलेल्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. यावरून महापालिका निवडणुकीची आचारसंहिता अधिवेशन संपल्यानंतर लगेचच दोन-चार दिवसात लागणार असल्याचे संकेत यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
नगर अभियंता आकुलवार यांना धरले धारेवर
रमाई आवास योजने संदर्भात बोलताना ‘शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांना बसविले आहे. नागरिकांपासून योजना वंचित ठेवण्यासाठी नाही’ या शब्दात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूर महापालिकेच्या नगरअभियंता सारिका आकुलवार यांना धारेवर धरले.
दीड वर्षात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणारः आयुक्त
बैठकीत रात्रीचा पाणीपुरवठा बंद न करता त्याची वेळ कमी करण्याचा शब्द सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिला तर मनपा आयुक्त सचिन ओम्बासे यांनी दीड ते दोन वर्षात सोलापूरकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे यांना दिली.
श्री सिद्धेश्वर यात्रेपूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करा
मनपा परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे यांनी श्री सिद्धेश्वर यात्रा निमित्ताने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रा जानेवारीमध्ये सुरू होत आहे. संक्रांतीच्या या सणादरम्यान शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, असे आदेश बनसोडे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना दिले.
सोलापूरसाठी आवश्यक निधी दिला जाईल : अजित पवार
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी आवश्यक निधी यासह विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त यांना फोन लावला. सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी लागणारा आवश्यक निधी तसेच इतर प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी आयुक्तांशी बोलताना दिली.