शहरातील स्मार्ट रस्त्यावर सांड पाण्याचा सडा : वारंवार वाहणाऱ्या सांडपाण्याच्या त्रासाने नागरिक हवालदिल
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ५ जुलै – सोलापूर शहरवासियांच्या घरासमोर नेहमी स्वच्छ पाण्याचा सडा रांगोळी असे नीटनेटके चित्र दिसून येते. मात्र स्मार्ट शहरातील स्मार्ट रोडवर दररोज सांडपाण्याचा सडा सर्रासपणे दिसून येत आहे. शहरातील असंख्य भागात सांडपाणी अव्याहतपणे रस्त्यावरून वाहत असते. सदरच्या सांडपाण्याचा सिलसिला नेहमीच सुरू असतो. शहराच्या प्रत्येक भागात सकाळी सकाळी स्वच्छ पाण्याच्या साड्याऐवजी दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा सडा निदर्शनास येतो. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना जिकरीचे बनते. एखाद्या नदीप्रमाणे सांडपाण्याचा प्रवाह वाहत असतो. या सांडपाण्यातून जाताना पादचारी दुचाकीस्वार यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. सांडपाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळते का असा प्रश्न देखील नागरिकांना सतावतो आहे. शहराच्या प्रमुख भागात ही समस्या नेहमी दिसून येते. स्मार्टसिटी अंतर्गत शहरात नवीन सिमेंट काँक्रेटचे रोड झाले. परंतु सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य नियोजन न झाल्याने ड्रेनेज चेंबर ठीक ठिकाणी ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर वाहताना दिसते.
दरम्यान शहरातील कन्ना चौक ते कोंतम चौक परिसरात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने याठिकाणी नेहमी सांडपाणी वाहते. वाहणाऱ्या सांडपाण्याने सर्वत्र रोगराई पसरत आहे. पावसाळ्यात यामुळे विविध रोगांचा धोका संभवत आहे. यावर महापालिका प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करणे आवश्यक आहे असे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
ऐन पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर रोगराईचा वाढतो प्रादुर्भाव….
पावसाळ्यात शहरातील विविध रस्त्यावर सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने रोडवर तळे साचते. सांडपाणी रस्त्यावर वारंवार वाहत असल्याने रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.