दडी मारलेल्या पावसाची शहरात दमदार एंट्री….
कडक उन्हाने त्रस्त झालेल्या शहरवासियांना मिळाला दिलासा…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. २१ सप्टेंबर – सोलापूर शहरात शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाची दमदार एन्ट्री झाली आहे. गणपतीच्या आगमनापूर्वी आलेल्या पावसाने गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारली होती. मात्र शुक्रवार ( दि. २० ) सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाची हजेरी लागली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार ( दि. २१ ) सकाळी देखील संततधार पावस कोसळला. शहरात अचानकपणे कोसळलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा दिला..
दरम्यान गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाची शहरात हजेरी होती. मात्र गणेशोत्सव काळात पावसाने दडी मारली. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाळ्या प्रमाणेच रखरखीत ऊन होते. यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत होता. वाढत्या उन्हाच्या झळांनी नागरिकांना त्रस्त केले होते. वाढते उन्ह पाहता वरुणराजाची कृपादृष्टी आपल्यावर बरसेल अशी आशा व्यक्त केली जात असतानाच, पावसाने अचानकपणे आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.
शनिवारी सकाळी सकाळीच पुन्हा एकदा रिमझिम पावसात नागरिकांना भिजत जावे लागले. तर काहींनी रेनकोट आणि छत्री यांचा आधार घेतल्याचे चित्र दिसून आले. गणपती बाप्पांचे आगमन आणि विसर्जन काळात वरुणराजा नेहमीच हजेरी लावतो. परंतु यंदा पावसाने गणेशोत्सव काळात दडी मारली होती. त्यानंतर शुक्रवार ( दि.२० ) संध्याकाळपासून पावसाची सुरुवात झाली. शनिवार ( दि.२१ ) देखील संततधार जलधारा बरसत राहिल्या, काही भागात जोरदार तर काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडला.
नवरात्री निमित्त स्वच्छता सुरू केलेल्या नागरिकांची उडाली धांदल..
अचानकपणे कोसळलेल्या या पावसाने नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडवली. नवरात्री निमित्त घरातील स्वच्छता सुरू केलेल्या शहरवासियांना या पावसाचा नाहक त्रास सहन करावा लागला. अनेक नागरिकांनी घरातील अडगळीचे साहित्य बाहेर काढून घराची स्वच्छता सुरू केली होती. सकाळी पडलेले कडक ऊन पाहता धुणी धुवावतीत, या इराद्याने कपडे धुण्यासाठी सुरुवात केली असता, संध्याकाळी पाऊस पडल्याने अनेकांचा पावसाने हिरमोड झाला.