सोलापूर एसटी स्टँडसमोर बेशिस्त वाहतूकीची रीघ : बेशिस्त रिक्षा चालक ठरतायत अपघाताला कारणीभूत : वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईत स्वातंत्र्य ठेवण्याची गरज :
गजबजलेल्या सोलापूर बसस्थानक परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांवर ठेवावा अंकुश : नागरिकांसह प्रवाशांची मागणी
सोलापूर दिनांक :- सोलापूर बस स्थानकावर मूलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. तर दुसरीकडे सोलापूर बस स्थानकाबाहेर देखील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बस स्थानकामध्ये विविध समस्या डोके वर काढत आहेत तसेच बसस्थानकाबाहेर देखील बेशिस्त वाहतूक अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. या बेशिस्त वाहतुकीचा एखादा निष्पाप जीव बळी ठरू नये यासाठी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. दररोज राजरोसपणे कोणत्याही पद्धतीने रिक्षा चालक रिक्षा चालवतात, प्रवासी दिसताक्षणी रस्त्याच्या मधोमध ब्रेक लावून रिक्षा उभी करतात. पाठीमागे कोणते वाहन आहे याचा देखील विचार केला जात नाही. बेशिस्त वाहतुकीमुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते मात्र याकडे वाहतूक शाखेच्या पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. एखाद्यावेळी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो मात्र त्यामध्ये सातत्य ठेवले जात नाही त्यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांना अधिक वाव मिळत आहे.
दरम्यान वाहतूक शाखेकडून संबंधित बेशिस्त रिक्षाचालकावर कारवाईचा बडगा उगारला जातो परंतु सदरची कारवाई तात्पुरत्या स्वरूपाची ठरते त्यामुळे त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी सोलापूर बस स्थानकासमोर हेच दृश्य दिसून आले. बस स्थानकातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी रिक्षा चालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा थांबवून वाहतूक कोंडी करत असल्याचे दिसले. तर काही ठिकाणी रिक्षा चालकांनी बेशिस्त वाहतूकीचे दर्शन घडवले. बेशिस्त वाहतुकीचा बसस्थानकात जाणाऱ्या अबालवृद्ध प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. मधोमध रिक्षा उभी केल्याने रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत त्यांना करावी लागली.
एकंदर पोलीस प्रशासनाने गजबजलेल्या ठिकाणी बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करण्यात सातत्य ठेवावे आणि नागरिकांना तसेच प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करून द्यावी असा सुर आता उमटत आहे.