एकीच्या बळावरच पद्मशाली समाजाचे प्रश्न सुटतील – सुशीलकुमार शिंदे
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे सोलापुरातील अधिवेशन थाटात संपन्न..!
प्रतिनिधी | सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २९ सप्टेंबर- पद्मशाली समाजातील गट-तट दूर करून एकी झाल्यास या बळावर समाजाचे व समाजाशी निगडीत विडी-यंत्रमाग उद्योगाचे प्रश्न सुटतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी सोलापुरात केले. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघातर्फे गांधीनगरन येथील बोमड्याल मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या पद्मशाली अधिवेशनात ते बोलत होते.
आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले की, या अधिवेशनात होणाऱ्या विविध ठरावांच्या बाजूने राहण्यास मी कटिबद्ध आहे. एकेकाळी गंगाधरपंत कुचन यांच्या रूपाने या समाजाला चांगले नेतृत्व मिळाले. अलीकडच्या काळात नेतृत्वासंदर्भात शिथिलता आली आहे. वस्त्रोद्योगातील मंदीचा मोठा प्रभाव सोलापुरात पडला आहे. या समाजाचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रणिती शिंदे, अ.भा. पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार, अध्यक्ष कंदागटला स्वामी,महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे, सरचिटणीस दयानंद मामड्याल, माजी आमदार नरसय्या आडम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, रामकृष्ण कोंड्याल, जनार्दन कारमपुरी, रामचंद्र जन्नू, माजी आ.सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जगन्नाथ गड्डम, विश्वनाथ वनम , अ. भा. पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्षा दुष्यंतला वनम, अ.भा.पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोठे, अ.भा.पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, पद्मशाली समाजाच्या अभिनेत्री बी.अन्नपूर्णा, अंबादास बिंगी, पेंटप्पा गड्डम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योगाला लष्करासाठी गणवेश तयार करण्याचे काम देऊ, असे अभिवचन दिले होते. मात्र ते त्यांनी आजतागायत पूर्ण केले नाही. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यावरच विडी बंडलावरील वैधानिक इशारा छापण्याचा नियम अधिक कडक करण्यात करण्यात आला, त्यामुळे या उद्योगावर मोठा परिणाम झाला. अजूनही या उद्योगावर टांगती तलवार आहे. यंत्रमाग कल्याणकारी मंडळ स्थापना करण्याचा निर्णय काँग्रेसच्या सत्ताकाळात झाला, मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपने त्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही. हे लक्षात घेता भाजपच्या राजवटीत पद्मशाली समाज, विडी व यंत्रमाग उद्योगाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. भाजपच्या मोठ्या नेत्यांपासून या समाजाच्या एकतेला धोका आहे. हे लक्षात घेऊन या समाजाने सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जात धर्माच्या मुद्द्यावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. आगामी विधानसभा निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या मुद्द्याला बळी पडू नका. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. युवक व महिलासंबंधी स्वतंत्रपणे चर्चासत्र घेण्यात आले. याप्रसंगी श्रीधर सुंकरवार, नरसय्या आडम, अशोक इंदापुरे आदींची भाषणे झाली. उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महेश कोठे यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका बुधारम व गिरीश गोसकी यांनी केले.
पद्मशाली संघम अधिवेशनात मांडण्यात आले विविध ठराव खालील प्रमाणे…
१) पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन करून त्याकरिता सुमारे पाचशे कोटींची तरतूद शासनाने करावी.
२) विशेष मागास प्रवर्गास (एस.बी.सी.) कायद्याच्या चौकटीवर टिकणारे दोन टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर करावे.
३) वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था आणण्यासाठी आधुनिकीकरण व खेळत्या भांडवलासाठी अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे.
४) विडी कामगारांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा.
व यंत्रमाग कामगार मंडळ स्थापन करावे.
५) पद्मशाली समाज पारंपरिक विणकर असल्याने वस्त्रोद्योगाकरिता एससी, एसटीच्या धर्तीवर सवलती द्याव्यात.
६) विशेष मागास प्रवर्गास नोकरीसाठी देण्यात आलेले दोन टक्के स्वतंत्र आरक्षण रद्द करण्यासाठी उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल आहे. याबाबत न्यायालयात शासनाकडून सक्षम बाजू मांडून संरक्षण देण्यात यावे.
समाजाचा आमदार झाला तरच प्रश्न सुटतील….
अधिवेशनाचे स्वागत व प्रास्तविक करताना महेश कोठे यांनी विविध मुद्दे मांडले. महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने महर्षी मार्कंडेय यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. विडी व यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्याने याउद्योगांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन उर्जितावस्था देण्याची गरज आहे. भाजपने पद्मशाली समाजाचा केवळ वापर करण्यापलीपणे काही केले नाही. हे लक्षात घेता आगामी निवडणुकीत समाजाचा आमदार झाला तरच आपले प्रश्न सुटतील.
– महेश कोठे, अध्यक्ष पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र संघम.