तैलाभिषेकांनतर आज होणार संमती कट्ट्यावर श्रीसिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा…
सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगाना तैलाभिषेक करून सिद्धेश्वर यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ जानेवारी
” बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र,श्री सिद्धेश्वर महाराज की जय,असा जयघोष करत पांढरा शुभ्र बाराबंदीचा पोशाख परिधान केलेल्या हजारो सिद्धेश्वर भक्तांच्या साक्षीने श्री सिद्धेश्वर महाराजांनी सोलापुरात स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगाना रविवारी तैलाभिषेक करण्यात आला. पहिल्या दिवशी मानाच्या सातही नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीद्वारे मंगलमय वातावरणात तैलाभिषेक करून सायंकाळी मानाचे सातही नंदीध्वज विसावले.
दरम्यान, रविवारी सकाळी नऊ वाजता उत्तर कसबा येथील हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा मानकरी हिरेहब्बू परिवारातील राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख तसेच सुदेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी काशीपिठाचे डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, खा.प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मानाच्या नंदीध्वजांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. सर्वात पुढे पंचरंगी ध्वज होता. त्यानंतर हलग्यांचे पथक, सनई चौघडा,बग्गी, आणि बँड पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
श्रीसिद्धरामेश्वरांच्या तैलाभिषेकाची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा अबालवृद्ध व महिला भाविकांसह तमाम सोलापूरकरांनी गर्दी केली होती. जसजशी मिरवणूक मार्गस्थ होत होती तसतशी भाविकांची गर्दी श्रीसिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी वाढत होती.
नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यातून बाहेर पडल्यानंतर नंदीध्वजाचे दर्शन घेण्याबरोबरच नवस फेडण्यासाठीसुद्धा सिद्धेश्वर भक्तांची मोठी रीघ लागली होती. नंदीध्वजधारकाच्या पायामध्ये चिमुकल्या बाळगोळपांना झोपवून त्यावरून मानाचे नंदीध्वज ओलांडण्याचे नवस फेडण्यात आले. तसेच नंदीध्वजाला खोबऱ्याचा हार आणि बाशिंग बांधण्याची परंपरा असून यंदाही हार आणि बाशिंग बांधून सिद्धेश्वर भक्तांनी नंदीध्वजांचे मनोभावे दर्शन घेतले. या मिरवणुकीत बालनंदीध्वजधारक बाराबंदीच्या पोशाखात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
अभिषेकासाठी निघालेल्या नंदीध्वजांच्या मिरवणुकीत मातीच्या घागरीत तेल गोळा करण्याची परंपरा शिवशेट्टी परिवाराला आहे. त्यानुसार योगीनाथ शिवशेट्टी यांच्याकडे भाविक तेलाभिषेकासाठीचे तेल अर्पण करत होते. दुपारी मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर तेथे पहिल्या अमृत लिंगाजवळ शिवलिंगाला पहिला अभिषेक करून मिरवणूक मार्गस्थ झाली. पहिला अभिषेक झाल्यानंतर मानकऱ्यांना मानाचा विडा देण्यात आला. तत्पूर्वी मानाच्या सातही नंदीध्वजांची मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या फाटकाजवळ आल्यानंतर राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख,सुदेश देशमुख यांच्या हस्ते मानकरी हिरेहब्बू यांना फेटा व उपरणे घालून सरकारी आहेर करण्यात आला. ब्रिटिश काळापासून सरकारच्या वतीने याच ठिकाणी आहेर देण्याची परंपरा आहे.तत्पुर्वी विजापूर वेशीत मुस्लिम बांधवांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले.शनिवारी नंदीध्वज रात्री उशिरा पोहोचले. सोमवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर श्रीसिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडणार आहे. यासाठी लाखो भाविकांची येथे उपस्थिती राहणार आहे. यावेळी मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
“सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार अन् चारही देशांनी होणार अक्षतांचा वर्षाव”
भोगी दिवशी सकाळी नऊ वाजता यात्रा प्रमुख व पूजारी हिरेहब्बू यांच्या वाड्यातून हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पुजा होऊन मिरवणुकीने सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्याजवळ दाखल होतात. येथे सातही नंदीध्वज आल्यानंतर श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पुजा हिरेहब्बू व देशमुख करतात. त्यानंतर कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते विडा दिला जातो. त्यानंतर श्री तम्मा शेटे संमती मंगल अष्टक हे हिरेहब्बू यांच्या स्वाधीन करतात. व त्यानंतर हिरेहब्बू व देशमुख त्या संमतीची विधिवत पुजा करतात. हिरेहब्बू हे शेटे यांना विड्याचा मान देतात. त्यानंतर हिरेहब्बू ते संमती मंगल अष्टक तम्मा शेटे यांच्या स्वाधीन करतात ही रुढी परंपरा चालत आलेली आहे. त्यानंतर हिरेहब्बू देशमुख व तम्मा शेटे संमती कट्टयावर येऊन त्याठिकाणी श्री तम्मा शेटे संमती वाचन करतात. “सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा” असा उच्चार होताच चारही दिशांनी अक्षतांचा वर्षाव सिद्धेश्वर महाराज आणि मानाच्या नंदीध्वज यांच्यावर होतो. अशाप्रकारे अक्षता सोहळ्याचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो. त्यानंतर सातही नंदीध्वज अमृतलिंगाजवळ येतात. त्याठिकाणी हिरेहब्बू व शेटे यांच्या हस्ते अमृत लिंगाची पंचामृत अभिषेक करून विधिवत पुजा होते. त्यानंतर शेटे यांना हिरेहब्बू हे विडा देतात व इतर मानकऱ्यांना विड्याचा मान दिला जातो. त्यानंतर श्रीसिध्दरामेश्वरांच्या गदगीस अभिषेक करून हिरेहब्बू हे विधिवत पुजा करतात. तेथील विड्याचा मान तम्मा शेटे यांना दिला जातो. व पुन्हा नंदीध्वज ६८ लिंगास प्रदक्षिणा घालून परत हिरेहब्बू यांच्या वाड्यात परत येतात.