प्रलंबीत अनुदानासाठी शिक्षकांचा महामोर्चा ; हलगी आणि तुतारी वाजवून वेधले सरकारचे लक्ष…

प्रलंबीत अनुदानासाठी शिक्षकांचा महामोर्चा ; हलगी आणि तुतारी वाजवून वेधले सरकारचे लक्ष…

हालगीच्या निनादात निघाला महामोर्चा…

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि ६ ऑगस्ट – सौलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी तसेच राज्यातील विविध शाळांचे प्रलंबीत अनुदान तात्काळ मिळावे या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांच्या विविध संघटनांच्यावतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौकातून या भव्यदिव्य अशा महामोर्चाची सुरुवात झाली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हालगी आणि तुतारीच्या निनादात प्रलंबित अनुदान मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत सदरचा महामोर्चा जिल्हाधिकारी कर्यालयाकडे रवाना झाला.

          राज्यातील विविध अनुदानित खाजगी आणि सरकारी शाळांचे २० टक्के , ४० टक्के , ६० टक्क्यांवरील अनुदान गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे सदरचे अनुदान संबंधित शाळांना तात्काळ मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन महामोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बॅनर घेऊन विविध घोषणा देत शिक्षकांच्या मोर्चाचे स्वरूप वाढतच गेले. यावेळी महामोर्चात सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळांचे शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

    दरम्यान महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील अनेक शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने शाळेसमोर बिकट समस्या निर्माण झालेले आहे. यासंदर्भात विविध संघटनेच्यावतीने शासन दरबारी निवेदने देऊन पाठपुरावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला परंतु शासनाने हे प्रश्न सोडविण्याच्या संदर्भात उदासीनतेचे धोरण अवलंबिलेले आहे. शाळेसमोरील प्रश्न व समस्या शासन दरबारी मान्य झाल्याशिवाय शाळेतील प्रशासन सुकर होणार नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयात एकाच वेळी लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय शासन दरबारी प्रश्न सुटणार नाहीत म्हणुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या दिनांक १९ जुलै २०२४ रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या सभेत ठरल्यानुसार शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी एकाच वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात मोर्चा काढुन शासनाचे लक्ष वेधण्यात आल्याचे शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सुभाष माने यांनी सांगितले.

        या मोर्चामध्ये जिल्हयातील शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक व पदाधिकारी, विविध शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक मोर्चात सहभागी झालेले होते. सदरच्या मोर्चामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी शाळा पुर्ण वेळ भरविण्यात येणार आहे.

शासनाकडे खालील प्रमुख शैक्षणिक मागण्यांसाठी काढला महामोर्चा……..

*शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्या

१) दि.१५ मार्च २०२४ च्या सेवकसंच शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी. शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर असावे.

२) दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा.

३) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने द्यावे तसेच शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावे.

४) पवित्र पोर्टल वरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी.

५) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात.

६) चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक न करता पूर्वीप्रमाणेच वेतनावर नेमणूक व्हावी.

७) अल्पभाषिक व अल्पसंख्यांक शाळातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील रिक्त पदांची १००% शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी.

८) शाळेमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी.

९) अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान जाहीर करावे.

१०) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार मिळावे तसेच २००८ नंतर अनुदानावर आलेल्या शाळांनाही त्यांच्या टप्प्या प्रमाणे वेतनेतर अनुदान देय करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *