कासेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा,
कासेगावला जिल्हास्तरीय “क्षयरोग मुक्त” ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ४ ऑगस्ट – सोलापूर जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबवण्यात येतो. त्याअंतर्गत “क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवून क्षयरोगाबद्दल जनजागृती व रुग्णांवर प्रभावी उपचार केल्याबद्दल कासेगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी डॉ. कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून सुमारे ५६ ग्रामपंचायती यासाठी निवडण्यात आल्या आहेत. संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यातून एकमेव कासेगाव ग्रामपंचायतची निवड यासाठी झाली ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. दिनांक २ ऑगस्ट, रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी मीनाक्षी बनसोडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे , जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावांमधील सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते.
क्षयरोग निर्मूलनाच्या गोळ्यांची तीस हजार पाकिटे पुरवल्याबद्दल प्रिसिजन फाउंडेशनचे सी एस आर प्रमुख माधव देशपांडे , संदीप पिसके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ही मोहीम राबवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी घोगरे , आरोग्य पर्यवेक्षक अमोल मोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कासेगाव आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. सायली चांदेकर , परिचारिका चौगुले आशा सेविका यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.