दक्षिण विधानसभेसाठी दिलीप माने यांनी थोपटले दंड ; उमेदवारी मागणी अर्ज केला दाखल
दक्षिण मधील नाराज नेत्यांची दुखावलेली मने घ्यावी लागणार जुळवून
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १६ जुलै – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर दक्षिण मतदासंघांसाठी माजी आमदार दिलीप माने यांनी दावा केला आहे. त्यानुसार दिलीप माने यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी घोडके पाटील यांनी काँग्रेस भवनमध्ये शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे आपला उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीतील राखीव जागेसाठी दहा हजार आणि खुल्या जागेसाठी वीस हजार रुपये असे शुल्क काँग्रेस कमिटीकडून आकारण्यात आले आहे. अर्ज भरतेवेळी हे शुल्क देखील जमा करावयाचे आहे. सदरचे शुल्क अदा करून अर्ज भरण्याचं आला आहे….
दरम्यान दक्षिण मतदार संघासाठी दिलीप माने पुन्हा एकदा दंड थोपाटले असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानसभा जिंकण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात पुढाकार घेऊन कामे करत त्याच्या जोरावर दक्षिणसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. तत्कालीन आमदारकीच्या काळामध्ये देखील त्यांनी दक्षिण तालुक्यात विविध विकास कामे केली होती. परंतु मोदी लाटेमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचा शिवधनुष्य उचलून विधानसभा लढवली परंतु त्याठिकाणी देखील त्यांना जनतेने स्वीकारले नाही. मुळात काँग्रेस सोडून गेल्यानंतर पक्ष बदलामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर माने काही काळासाठी दिलीप माने हे अलिप्त राहिले होते. आता त्यांनी कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेऊन आगामी विधानसभा या विषयावर चर्चा विनिमय करून पुन्हा एकदा सर्व ताकदीनिशी काँग्रेसकडूनच दक्षिण विधानसभा मतदार संघ लढवण्याचा चंग बांधला आहे.
दरम्यान दिलीप माने यांच्या नव्या इनिंगमुळे कार्यकर्त्यांमध्ये तसेच नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. माने हे मुंबईमध्ये जाऊन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्ष प्रवेश करत पुन्हा एकदा जोमाने तयारी सुरू केली आहे. त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे दिलीप माने हे नक्कीच दक्षिण काबीज करतील असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही नेते मात्र नाराज…
दिलीप माने यांनी काँग्रेसचा हाथ सोडून सेनेचा शिवधनुष्य उचलला होता. त्यामुळे शहर दक्षिण मतदारसंघांमध्ये आपली बाजू मांडून उमेदवारी मिळवता येईल का ? या विचारात काही नेते आपल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावत होते. मात्र दिलीप माने यांच्या घरवापसीमुळे त्यांच्या या फिल्डिंगवर पाणी पडलेले दिसत आहे. दक्षिण तालुक्यातील काही नेत्यांना दिलीप माने यांच्या घरवापसीचा त्रास होतो आहे. परंतु ते उघड उघड बोलत नाहीत. अशा नाराज नेत्यांचे मन वळवणे दिलीप माने जिकरीचे कार्य करावे लागणार आहेत.