प्रस्थापितांनी जनतेच्या विश्वासाचा सातत्याने अपमान केला – संतोष पवार
प्रस्थापित आमदारांना त्यांची जागा दाखवणार…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१७ नोव्हेंबर –
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीचे प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रचाराची धार आणखीन वाढत आहे. सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित आमदारांनी सातत्याने मतदारांचा अपमान केला, प्रस्थापितांनी निवडून आल्यानंतर जनतेच्या मतांचा आणि विश्वासाचा अपमानच केला आहे. त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. निवडणुकीपुरताच लोकांशी जवळीक दाखवणाऱ्या या नेत्यांनी सत्तेत येताच जनतेकडे पाठ फिरवली. याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे,” अशांना हद्दपार बेदखल करा, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार संतोष सेवू पवार यांनी व्यक्त केले. पुढे ते ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आयोजित प्रचार दौऱ्यात त्यांनी कुडल, बोळकवठा, चिंचपूर, टाकळी यांसारख्या गावांना भेट दिली. तसेच औराद येथे भरलेल्या जनसन्मान सभेत प्रस्थापितांवर त्यांनी जोरदार टीका केली.
निवडणुकीपुरताच जनतेचा उपयोग
“सोलापूर दक्षिण मतदारसंघावर नेहमीच प्रस्थापितांचे वर्चस्व राहिले आहे. निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी स्वप्ने दाखवून ते फसवतात. मात्र, निवडून आल्यानंतर विकासकामांच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा केला जातो. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल, असे वागण्यात प्रस्थापित नेत्यांना कधीच काही गैर वाटले नाही. त्यांच्या या कामचलाऊ वृत्तीमुळे मतदारसंघातील प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत,” असे संतोष पवार म्हणाले.
प्रस्थापितांची ठरलेली आश्वासने फसवीच
संतोष पवार यांनी सांगितले की, “तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर तीच ती आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. रस्ते, पाणी, शेती आणि रोजगारासारख्या मूलभूत समस्यांकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. खोटी आश्वासने आणि अर्धवट विकासकामांच्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवण्याचा त्यांचा खेळ आता थांबला पाहिजे.”
नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज
“आज तालुक्यातील शेतकरी, कामगार, महिला आणि तरुणवर्ग प्रस्थापितांच्या कामगिरीवर नाराज आहे. हा रोष आता कृतीत बदलण्याची वेळ आली आहे. मतदारांनी यावेळी नव्या नेतृत्वाला संधी देऊन बदल घडवला पाहिजे. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून विकासाचा एक नवा अध्याय लिहिण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे पवार म्हणाले.
संतोष पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की, “तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला तुमचा पाठिंबा हवा आहे. तुमचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्यास, प्रलंबित प्रश्न सोडवून सोलापूर दक्षिण मतदारसंघाला विकासाच्या मुख्य प्रवाहात नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन.” संतोष पवार यांच्या या परखड भाषणाने उपस्थित ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यांनी संतोष पवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.