दक्षिण मधील सिंचनाचा प्रश्न सोडवून हरितक्रांती करू ; काडादी
बसवनगर, मंद्रूप,येळेगाव,अंत्रोळी,वडापूर येथे गावभेट दौ-यास प्रतिसाद….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ नोव्हेंबर –
दक्षिण सोलापूर तालुक्यात अद्यापही सिंचनाचा प्रश्न सुटलेला नाही.त्यामुळे बहुतांश शेती कोरडवाहू आहे. तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविणे ही काळाची गरज आहे त्याशिवाय तालुका समृद्ध आणि वैभवशाली होणार नाही. तालुक्यात हरितक्रांती होण्यासाठी आपण वडापूर येथे बॅरेजेस करण्याबरोबरच सीना आणि भीमा या दोन्ही नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढवू तसेच तालुक्यात उजनी धरणाचे कालवे शेत शिवारात पोहोचवू अशी ग्वाही अशी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली.मंगळवारी ,काडादी यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल, मंद्रूप, येळेगाव, अंत्रोळी वडापूर येथे गाव भेट दौरा झाला या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, शेतकरी संघटनेचे शिवानंद दरेकर,युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे,मोतीलाल राठोड, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे, महादेव जम्मा, सिद्धाराम व्हनमाने, अरुण लातूरे, बाळासाहेब बिराजदार, शिवानंद कलशेट्टी, लक्ष्मण झळकी, अनंत म्हेत्रे, अख्तरताज पाटील, सिद्राम हेळकर आदी उपस्थित होते.
दरम्यान काडादी म्हणाले, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने नेहमीच जिल्ह्यात ऊसाला उच्चांकी दर दिला आहे.नेमकी हीच बाब आमदार सुभाष देशमुख यांना खटकली आहे.सहकारमंत्री असूनही सहकार चळवळीस आणि सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याऐवजी सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद पडला तर येथील ऊस आपल्या खासगी कारखान्यास मिळेल ही भावना ठेवून त्यांनी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा काहीच विकास कामे केली नाहीत.