जलजीवन मिशन योजनेची कोट्यावधींची थकीत देयके प्राप्त झाली नसल्याने उचलले टोकाचे पाऊल !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.५ डिसेंबर
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षाने थकित देयके प्राप्त न झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सदरच्या घटनेमुळे जिल्हा परिषद वर्तुळात भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, मोतीलाल राठोड असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या ठेकेदाराचे नाव असून ते सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. कोट्यावधीची देयके थकल्याने त्यांनी विष पिल्याची चर्चा जलजीवन मिशनच्या ठेकेदारांमधून ऐकण्यास मिळाली.
गुरुवार दि.५ डिसेंबर रोजी यासंबंधी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर अधिक माहिती देताना ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने सुमारे ५१ कोटी रुपयांची देयके थकली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, सचिव राहुल पाटील, कार्याध्यक्ष आनंद तोडकरी, हेमंत जाधव, किशोर कुलकर्णी, अण्णाराव पाटील, विवेक राठोड, श्रीकांत सोनी यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन योजनेचे बिल वेळेवर निघत नाही, जलजीवन मशीन योजने अंतर्गत सुरु असलेले कामे बिल निघत नसल्यामुळे बंद झालेले आहेत,आम्हाला आमचे बील मिळत नाही. ही गोष्ट संबंधित विभागाला माहीत असून सुद्धा जल जीवन मिशनची कामे चालू करा म्हणून आम्हाला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दबाव येत आहे, मुदत वाढीच्या विषयामध्ये विनाकारण आम्हाला दंड लावण्यात येत आहे, आमच्या संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल राठोड हे बिल निघत नसल्यामुळे दबावाखाली आले होते. सध्या ते खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, यावर जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेऊन ठेकेदारांच्या देयका संबंधीच्या अडचणी आणि समस्या निवेदनाद्वारे प्रशासनाच्या नजरेस आणून देण्यात आल्या आहेत. यावर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले आहे. असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.