व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्यशासनाची राजीखुशी ; सोलापूर ते मुंबई विमानप्रवास होणार सुखकर

सोलापूर – मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा…

व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी : पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : प्रतिनिधी

बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे – मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगार येण्याकरिता सोलापूर शहरातून मुंबई, बेंगलोर, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती. परंतु सोलापुर – मुंबई – सोलापूर विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती. उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळे यात अनेक अडथळे येत होते. यावर उपाय म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर – मुंबई – सोलापूर विमानसेवा सुरू होण्याची मागणी लावून ठरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा चर्चा केली होती. यानंतर सोलापूर – मुंबई – सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूरकरांना दिले होते. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत व्हायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.

काय आहे व्हायबिलिटी गॅप फंडिंग ?

विमानसेवा कायमस्वरूपी सुरू रहावी आणि प्रवाशांच्याअभावी विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून ती बंद होऊ नये याकरिता राज्य शासनाकडून संबंधित विमान कंपनीला प्रत्येक तिकिटामागे देण्यात येणाऱ्या ठराविक रकमेला व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणण्यात येते.

गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेले सोलापूर उद्योगविश्वाच्या नकाशावर लवकरात लवकर यावे आणि सोलापुरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि रोजगारांची निर्मिती व्हावी या हेतूने सोलापूर – मुंबई – विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले या प्रयत्नांना यश आले आहे. सोलापुरातील उच्चशिक्षित तरुण इतर जिल्ह्यांमध्ये जाण्याचे प्रमाण या निर्णयामुळे थांबणार आहे. सोलापूर – मुंबई विमानसेवेसाठी सकारात्मक निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ  सोलापूरचे  पालकमंत्री  जयकुमार गोरे  यांचे समस्त सोलापूरकरांतर्फे आभार

देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *