सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीवर ‘उत्तर’चाच शिक्का; सभापतीपदासाठी चार नावांत रेस
सोलापूर व्हिजन,
सोलापूर महानगरपालिकाच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांची वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सभापतीची निवड 6 मार्च रोजी होणार असून, 4 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

रविवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सभापती निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये सत्तासंतुलन राखण्याचा मुद्दा बैठकीत अधोरेखित करण्यात आला.
तीन मतदारसंघांमध्ये सत्तासंतुलन
महापौर पद – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ
सभागृह नेते व उपमहापौर पद – दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ
स्थायी समिती सभापती पद – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ (निश्चित)
या पार्श्वभूमीवर उत्तर मतदारसंघातील चार नावे चर्चेत आली आहेत:
अविनाश पाटील
बिजू प्रधाने
गणेश वानकर
रजिता चाकोते
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून येणाऱ्या संगीता जाधव यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंतिम निर्णय 4 मार्चलाच?
बैठकीत चर्चिलेल्या चार नावांपैकी एक नाव पालकमंत्री गोरे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शहराध्यक्षांना कळवणार आहेत. स्वीकृत नगरसेवक निवडीप्रमाणेच सभापती निवडीतही गुप्तता पाळली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, भाजपमधील अंतर्गत राजकारण लक्षात घेता पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे अनपेक्षित नाव पुढे आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘जोर का झटका धीरे से’ अशी राजकीय घडामोड होण्याचीही चर्चा रंगू लागली आहे.
सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. 4 मार्च रोजीच या सस्पेन्सवर पडदा पडणार आहे.