संतोष पवार यांच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….. नागरिकांना दिली सेवेची आणि कामाची हमी.

नेहरू नगर येथे संतोष पवार यांच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.११ नोव्हेंबर –

विधानसभा निवडणूक अधिक रंगतदार बनत चालली आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. सोलापूर शहराच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधक उमेदवारांमध्ये जोरदार लढत पाहावयास मिळत आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी ग्रामीण भाग पिंजून काढत, महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. विशेष करून बंजारा समाजाकडून त्यांना आत्मीय भावना मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेहरू नगर परिसरात   संतोष पवार यांनी पदयात्रा काढली.या पदयात्रेत पवार यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिकांच्या गरजा आणि समस्यांविषयी संवाद साधला त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

दरम्यान संतोष पवार यांनी या पदयात्रेतून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी दिल्यानंतर शहरी भागाकडे पदयात्रामधून गाठीभेटी दिल्या जात आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न ऐकले. ते म्हणाले की, “आपल्या भागातील नागरिकांनी आजवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांना निवडून दिले आहे, तरीदेखील भागातील अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्णच आहेत.

पवारांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका करताना सांगितले की, “ते फक्त किती कोटींचा विकास केला याचे मोठमोठे दावे करतात, परंतु प्रत्यक्षात स्थानिक विकासाच्या आघाडीवर काहीच कृती होताना दिसत नाही. या स्थितीत आता बदल घडवून आणण्याची गरज आहे.”यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचे आवाहन पवार यांनी केले.

या पदयात्रे दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि मार्ग फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी स्थानिकांच्या समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली आणि आगामी निवडणुकीत संतोष पवार यांना संधी देण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *