शहर दक्षिण साठी सुभाष देशमुख यांनी भरला अर्ज ;
विकास कामांच्या बळावर निवडणूक जिंकण्याचे दिले आश्वासन. !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २४. ऑक्टोंबर – दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी माजी सहकारमंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुपुष्यामृत योग साधून आमदार सुभाष देशमुख यांनी अर्ज भरला.
अर्ज भरताना त्यांच्यासमवेत भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामप्पा चिवडशेट्टी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी मला पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी दिली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात वडापुर बॅरेज, भीमा सीना जोड कालवा, मंदृप एमआयडीसी, रोजगारनिर्मिती, शैक्षणिक कामे दृष्टीपथात आहेत.आजवर केलेल्या विकासाच्या बळावर महायुतीचा विजय निश्चित आहे, असेही आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला (शिंदे गट) अपेक्षित ठिकाणी महायुतीतून उमेदवारी न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. त्याबाबत आमदार देशमुख म्हणाले, महायुतीतील सर्व घटकपक्ष राज्य, जिल्हा आणि विधानसभा स्तरावर एकत्रच काम करणार आहेत.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनिष देशमुख, रोहन देशमुख, हणमंत कुलकर्णी, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.