दक्षिणमधील गावभेट दौर्‍यात काडादी यांची ग्वाही ! ग्रामस्थांना दिला हा शब्द

पाणी, वीज, रोजगाराचा प्रश्न सोडवू

दक्षिणमधील गावभेट दौर्‍यात काडादी यांची ग्वाही..!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.९ नोव्हेंबर – दहा वर्षांपूर्वी मतदारांनी ज्यांना मोठ्या आशेने निवडून दिले. त्यांनी मतदारसंघाचा विकास करण्याऐवजी द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे जनतेचे मूलभूत प्रश्नही सुटले नाहीत. सुडाचे राजकारण करणार्‍या लोकप्रतिनिधीला पराभूत करण्याची हीच वेळ असून आपल्याला मतदारांनी सेवेची संधी दिली तर या मतदारसंघातील शेतीच्या सिंचनाबरोबरच पिण्यासाठी पाणी, वीज, रस्ते आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लावून तरूणांना स्वावलंबी बनवू, अशी ग्वाही सोलापूर  दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली.

शनिवारी, काडादी यांनी वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, अकोले (मंद्रूप), गुंजेगाव, कंदलगाव, अंत्रोळी आणि निंबर्गी या गावांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. या दौर्‍यात ठिकठिकाणी काडादी यांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या या दौर्‍यात स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती महादेव पाटील, भीमाशंकर जमादार, सिकंदरताज पाटील, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे, शिवानंद पाटील- कुडल, राजशेखर पाटील, अ‍ॅड. शिवशंकर बिराजदार, सुरेश झळकी, लक्ष्मण झळकी, प्रा. संतोष मेटकरी, शिवशरण दिंडोरे, अशोक देशमुख आदी उपस्थित होते.

 मतदारांशी झालेल्या संवादाच्यावेळी काडादी म्हणाले, या मतदारसंघातील मतदारांनी ज्यांना दहा वर्षे निवडून दिले. त्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विकासाचे राजकारण करण्याऐवजी सहकारी संस्था व सहकारी चळवळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सहकारमंत्री असताना त्यांनी सहकारी संस्थांचे बळकटीकरण व सक्षमीकरणासाठी पदाचा सदुपयोग करण्याऐवजी त्यांनी सहकारी संस्था बंद पाडण्याचे धोरण अवलंबले. शेतकर्‍यांसाठी मंदिरासमान असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून राज्याच्या सहकार चळवळीत आदर्श असलेला हा साखर कारखाना बंद पाडण्याचे कुकर्म केले. त्यामुळे त्याचा राग शेतकरी सभासद आणि समस्त मतदारांमध्ये आहे. शेतकर्‍यांच्या अन्नामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केलेल्या भाजपच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पराभूत करून आपला राग दाखवून दिला. तोच संताप अजूनही कायम असून सिध्देश्वर कारखाना बंद पाडून स्वत:चा खासगी कारखाना चालावा म्हणून हा उद्योग करणार्‍या भाजपच्या आमदाराला मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काडादी यांनी व्यक्त केला.

खासदार, आमदार आणि मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतरही या भाजपच्या लोकप्रतिनिधीनी मतदारसंघाचा विकास केला नाही. उजनी धरणाचे हक्काचे पाणीही ते मतदारसंघातील शेतकर्‍यांना मिळवून देऊ शकले नाहीत. कालव्याची कामे अपूर्ण ठेवली. सिंचनाचे नवे स्रोत ते तयार करू शकले नाहीत. भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेज बांधण्याचे आश्वासन देऊन त्यांनी लोकांचा विश्वासघात केला. बॅरेज तर केलेच नाही, उलट पावसाळ्यात उजनी धरण भरल्यानंतर अतिरिक्त झालेल्या पाण्याने तालुक्यातील गाव तलाव, पाझर तलाव आणि ओढ्या-नाल्यांना पाणी सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. सीना आणि भीमा नद्यांवर बॅरेज बांधून शेतीला पाणी मिळवून दिले असते तर शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढून शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारली असती. शेतीच्या विजेचा प्रश्नही त्यांना सोडविता आला नाही. आजही अनेक शेतकरी शेतीला वीज मिळावी म्हणून धडपडताना दिसतात. वीज नसल्यामुळे शेतीची सुधारणा होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारू शकली नाही.

मिळालेल्या पदाचा लोकहितासाठी वापर करण्याऐवजी त्यांनी तालुक्यात भांडणे लावण्याचेच काम केले. निवडणुकीपुरते राजकारण मर्यादित असले पाहिजे. परंतु स्वार्थासाठी दुसर्‍यांच्या संस्था बंद पाडून आपल्याच संस्था चालाव्यात, हे त्यांचे कुटील राजकारण तालुक्यासाठी अत्यंत धोकादायक ठरले. त्यामुळे या लोकप्रतिनिधीला पराभूत करून, मतदारांनी आपल्याला संधी दिल्यास शेतीच्या व पिण्याच्या पाण्याबरोबच, विजेचा प्रश्नही मार्गी लावू, ग्रामीण भागात शेतीला जोडव्यवसाय असलेल्या दुग्धोत्पादनासारखे प्रकल्प सुरू करून शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही काडादी यांनी दिली.

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील प्रश्नांकडे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. सर्व प्रकारची सत्ता असतानाही  शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात कमी पडले. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शहराच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. ज्यांच्याकडे पाणी साठविण्याचे साधन नाही, अशा गोरगरीब व कामगारांची मोठी अडचण होत आहे. हद्दवाढ भागात रस्ते, ड्रेनेज, पथदिव्याची सोय नाही. प्रामाणिकपणे कर भरणार्‍या करदात्यांचा त्यांनी भ्रमनिरास केला. शहरी बससेवा मोडकळीस आलेली असतानाही त्यामध्ये सुधारणा करण्याचे त्यांनी स्वारस्य दाखविले नाही. हजारो कोटींचा निधी मिळूनही स्मार्ट सिटी भकास राहिली. शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर होऊनही त्यांना ते प्रकल्प मार्गी लावता न आल्याने सोलापुरात वाहतुकीची कोंडी होताना दिसते, असे काडादी म्हणाले. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपल्याला मतदारांनी सेवेची संधी दिली तर सर्वांना सोबत घेऊन ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्न सोडविण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, असा विश्वास काडादी यांनी दिला.

काडादी यांनी भरघोस मतांनी विजयी करा : शिवदारे

राजशेखर शिवदारे म्हणाले, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी मोठ्या कष्टाने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून शेतकर्‍यांच्या उसाचा प्रश्न सोडविला. त्यांना आर्थिक स्वावलंबी बनविले. गरिबांच्या मुलांसाठी शैक्षणिक संस्था उभारल्या. या संस्थांची धुरा धर्मराज काडादी यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या सक्षमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दहा वर्षांत त्यांना व्यक्तिगत व सिध्देश्वर परिवारातील संस्थांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. या संस्था टिकविण्यासाठी काडादी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेत मतदारांनी निवडून पाठवावे. स्वच्छ प्रतिमा, पारदर्शी कारभार, निर्मळ आणि निस्पृह व्यक्तिमत्त्वाच्या काडादी यांच्यासोबत काँग्रेसची सर्व मंडळी असल्याने त्यांना मतदारांनी सेवेची संधी द्यावी, त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘कॉम्प्युटर’समोरील बटण दाबून त्यांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन केले. निवडून आल्यानंतर शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि शहरी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते निश्चितपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गटबाजी बाजूला सारून काडादी यांना विजयी करा : शेळके

बाळासाहेब शेळके म्हणाले, धर्मराज काडादी यांच्या प्रचार दौर्‍यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ते अपक्ष असले तरी आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी त्यांच्यासमवेत आहोत. त्यामुळे काडादी हे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत. मतदारांनी आपापसातील मतभेद, गटबाजी आणि हेवेदावे बाजूला ठेवून काडादी यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे. मागच्या दहा वर्षांत ज्या चुका केल्या त्या आता करू नका, कोणाबद्दलही राग, द्वेष नसलेल्या काडादी यांना विजयी करून तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी त्यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नद्यांवर बॅरेज बांधून सिंचनाचा प्रश्न सोडवू

वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधण्याची भाजपच्या आमदारांनी आतापर्यंत नुसती आश्वासने दिली. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. भीमा आणि सीना नद्यांवर बॅरेज बांधले असते तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला नसता. मतदारांनी आपल्याला सेवेची संधी तर या दोन्ही नद्यांवर बॅरेज बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी राहील यासाठी प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी गावभेट दौर्‍यात मतदारांना दिली. उजनीच्या हक्काचे पाणी कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळवून देऊ, असेही त्यांनी आश्वासित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *