महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ डिसेंबर
राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन केली. मागील ८ वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका अखेर लागल्याने कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवार १५ डिसेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

दि. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्ज छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २ जानेवारी २०२६ ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर १३ दिवस प्रचाराला देण्यात आले असून १५ जानेवारीला राज्यात महापालिकेसाठी मतदान होणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी मतमोजणी घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
ऐन सिद्धेश्वर यात्रेत नवडणुकीचा बार उडणार आहे. यात्रेचे कालावधीत निवडणूक लागल्याने यंदाची राजकीय संक्रांत कोणावर ओढवणार याचा बोलबाला ऐकण्यास मिळत आहे. जानेवारी महिना तसेच सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. अशा धामधुमीतच निवडणुकीचा बार उडणार असल्याने सारेच जन निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.