सोलापूर पुणे हायवे ठप्प ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
हायवे बंद मग काय करणार…वेळ घालवण्यासाठी रस्त्यावर टाकल्या चटया अन् केला आराम ; तर काहींनी कारमध्ये घेतली डुलकी

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे. सीना नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने लांबोटी येथील पूल वाहतुकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे सोलापूर पुणे ही वाहतूक काल रात्रीपासून बंद ठेवण्यात आली आहे. या मार्गावर जड वाहने तसेच मालवाहतूक ट्रक यांची संख्या जास्त आहे. खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील येथे दिसून आली. रस्ता बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदरची वाहतूक बंद ठेवण्यामुळे सुमारे सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून वाहनधारक ता मिळवण्याची वाट पाहत रस्त्यावरच उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.



वेळ घालवण्यासाठी रस्त्यावर टाकल्या चटया अन् केला आराम ; तर काहींनी कारमध्ये घेतली डुलकी
दरम्यान सीना नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह कायम असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धोक्याची पातळी कमी झाल्यानंतर हा रस्ता सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतरच सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरळीत होणार आहे. रस्त्यावर वाहनधारक ताटकळत उभे असल्याने काही वाहनधारकांनी रस्त्यावरच आराम करण्यासाठी चटई टाकल्याचे दृश्य पहावयास मिळाल. तर काहींनी आपल्या कारमध्येच दरवाजे एवढे ठेवून झोप काढली. यावाहनधारकांना आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी आणखीन काही तास वाट पाहावी लागत असल्याने महामार्गावर आराम करणे पसंत केले.
आदिला नदी ओव्हर फ्लो घरात पाणी
शहरालगत असणाऱ्या आदीला नदीच्या पात्रात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे अवंती नगर परिसरातील विविध नगरात पाणी शिरलेले दिसत आहे. आदिला नदी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहत असल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली दिसत आहे. त्यामुळे जुना पुणे नाका तसेच अवंती नगर गणेश नगर या परिसरात पाणीच पाणी झालेले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्याने येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहर व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने धोक्याच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.