भवानीज्योत घेऊन जाणाऱ्या देवीभक्तांवर काळाचा घाला
- सोलापूर पुणे महामार्गावरील आकुंभे गावाजवळ पिकअपने पाठीमागून ठोकरले
- तुळजापूरवरून बादलेवाडी निमगाव (टेंभुर्णी)येथे भवानीज्योत घेऊन निघाले होते तरुणांना
- भरधाव पिकअपने पाठीमागून दिली जोरदार धडक एक तरुण गंभीर तर पाच तरुण किरकोळ जखमी


सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर / प्रतिनिधी
घटस्थापनेचा दिवस देवीभक्तांसाठी क्लेशदायक ठरला. बादलेवाडी निमगाव टेंभुर्णी येथील देवीभक्त तुळजापूर होऊन भवानी ज्योत घेऊन जात असताना सोलापूर पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव पिकअप क्रमांक एम.एच.१३ ई.पी.१५९३ या वाहनाने रस्त्याच्या बाजूने ज्योत घेऊन चालणाऱ्या तरुणांना धडक दिली. ही घटना दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
या जोरदार झालेल्या अपघातात अमर वेताळ वाघमोडे (वय २५), भुंजंग बाळासाहेब वाघमोडे (वय २५), समाधान भारत वाघमोडे (वय ३०), संकेत शहाजी सुरवसे (वय २५),सचिन रमेश येळे (वय २५), बालाजी गणेश लोंढे (वय २१) (सर्वजण रा. बादलेवाडी निमगाव ता.माढा.जि.सोलापूर) जखमी झालेल्या युवकाची नावे आहेत. पुढे जाऊन तोच पिकप वाहन एका आयशर टेम्पो क्रमांक एम.एच १३ सी.एच ४३९१ या वाहनावर जाऊन आदळला.
या अपघातात ज्योत घेऊन चालणाऱ्या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाले असून बाजूने चालणारे ईतर तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या तरुणांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ.महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक नागनाथ भालेराव यांनी टेंभूर्णी येथील खासगी रुग्णालयात तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, याअपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील गस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी तथा पोलीस उप निरीक्षक उमेश पवार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप, पोलीस अधिकारी सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्थी पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली.