दुहेरी जलवाहिनीतून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेल्या पाण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी !
आता शहराला आठवड्यातून किमान दोनदा मिळणार पाणी : आमदार देवेंद्र कोठे यांचीही उपस्थिती : पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीनंतर दररोज पाणी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ जून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले. या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली. यावेळी आमदार देवेंद्र कोठेही उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले, सोलापूरसाठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनविणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण झाले आहे. या कामाच्या पूर्तत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील यशस्वी पाठपुरावा केला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे.
पाकणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचविण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी ८५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे. पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतर सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत दर आठवड्यातून तीनदा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची मी चर्चा केली आहे. परंतु सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करणे हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे. त्यामुळे सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्दही नक्की पाळला जाईल. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष (पूर्व) शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
दिलेला शब्द पूर्ण करणारच
सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्द भारतीय जनता पार्टीने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विकासकामांनी वेग धरला असून सोलापूरकरांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत.
देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य