घंटागाडी बंद रस्त्यांवर पसरले कचऱ्याचे ढीगच ढीग,…..
पगारासाठी कर्मचाऱ्यांनी केला यल्गार …
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २१ ऑगस्ट – सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या घंटागाडीवर कचरा संकलन करण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामबंद केल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला पसरल्याचे चित्र दिसून आले.
सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणारा तीन महिन्यांचा प्रलंबीत पगार मिळावा यासाठी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी कामबंद केल्याने शहरात कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला पसरलेले आहेत. कामबंद आंदोलन सुरू करत कामावर बहिष्कार टाकला आहे. शहरातील आठ ही विभागीय कार्यालयाचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे शहरात कचरा संकलन आणि व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.शहरातील अनेक भागात कचरा इतरत्र पडला असल्याने सर्वत्र दुर्गंधीचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे.

प्रभागात आणि हद्दवाढ भागात घंटागाडी वेळेवर येत नसल्याने शहरातील नागरिकांनी प्रमुख रस्त्यावर कचरा टाकल्याने अस्वच्छता दुर्गंध जागोजागी पसरली आहे. यातून रोगराईला आमंत्रण मिळत आहे. कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन करण्याचे काम बंद केल्याने शहरातील विविध डेपोत घंटागाड्या जागेवरच उभ्या केल्याचे दृश्य पहावयास मिळाले.
ऐन पावसाळ्यात शहरातील कचरा संकलन व्यवस्थापन बिघडत असल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे. रोडवर कचरा टाकला जातो आहे त्यामुळे सर्वत्र रोगराई वाढत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने आणि महापालिका आयुक्त यांनी याप्रश्नी तात्काळ लक्ष द्यावे.
– पूजा बिराजदार , एक नागरिक