पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला मिळणार ई बस : सोलापूर विकास मंचच्या मागणीला यश ….

सोलापूर शहराला अनुसरून बसचा आकार निर्धारित ; सोलापूर विकास मंचच्या मागणीला यश ….

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १३ जुलै – सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आलेली आहे.गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. २०१४ साली जवळपास दीडशे बसेस आपल्याला जे.एन.एन.यु. आर.एम. योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या, त्या उण्यापुऱ्या तीन महिने सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत. आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत.

                          दरम्यान केंद्र सरकारच्या निवास व शहरी विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय मार्फत पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर २३ मध्ये १०० इ बसेस मंजूर झाल्या होत्या.  सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी, सलग सरळ रस्त्यांची लांबी, टर्निंग रेडियस, वळणं या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री डायरेक्ट पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई-बस चालणार नाहीत, त्या ऐवजी मिनीबस उपयुक्त आहेत, अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर केंद्रीय स्ट्रीट कमिटी यांनी खास सोलापूरसाठी ७० मिनी बस तर ३० नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर केल्या.

              दरम्यान या ७० बसेस सोलापूर शहरात सहजगत्या फिरू शकतात ,वळू शकतात, आणि प्रवाशांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल. केंद्र सरकारकडून तशा आशयाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचला वरील माहिती पत्राद्वारे कळवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *