गोळा बेरजेच्या राजकारणाला प्रारंभ आघाडी भाजपला गाठणार खिंडीत
भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ
रविवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन जागा वाटप अन् प्रभागांवर होणार चर्चा..

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१७ डिसेंबर
आगामी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजेल आहे. मतदान आणि मतमोजणी यांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. निवडणुकीच्या गोळा बेरजेच्या राजकारणाला आता सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमवेत मनसे, माकप, वंचित बहुजन आघाडी देखील असणार आहे. त्यांच्यात जागा वाटपाचा तिढा नसणार आहे. पण, कोणत्या पक्षाला किती जागा व कोणते प्रभाग कोणाला सोडायचे, यावर रविवारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

दरम्यान, भाजपने स्वबळाची तयारी केली असून, महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण एकत्रितपणे लढलो तर आपल्याला सर्वाधिक जागा मिळू शकतात, असा विश्वास महाविकास आघाडीला वाटत आहे. त्यानुसार शहरातील २६ प्रभागांमध्ये महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारीच उमेदवार असतील, अशी सद्यः स्थिती आहे. त्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महेश गादेकर, रियाज मोमीन, मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, वंचित बहुजनचे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, मापकचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम असे प्रमुख उमदेवार असतील. त्यांच्यासमवेत बाकीचे उमेदवार निवडणूक आणायचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नियोजन असल्याची चर्चा आहे.

आम्ही एकजुटीने लढून सर्वात मोठा पक्ष आमची महाविकास आघाडीच राहील, असा विश्वास सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. १६ जानेवारीला कोणता पक्ष मोठा आणि कोणाचा महापौर होणार हे स्पष्ट होणार आहे.
एमआयएमचा एकला चलो रेचा नारा भाजपविरोधात निवडणूक लढताना एमआयएमने शहरातील प्रभाग १४, १६, १७, २०, २१ आणि २२ मध्ये स्वबाळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शहराध्यक्ष शौकत पठाण यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हे सहा प्रभाग सोडून बाकीच्या प्रभागांमध्ये जुळवून घेण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासमवेत बोलणे सुरू असल्याचेही शौकत पठाण यांनी सांगितले. पण, त्यांचा हा प्रस्ताव महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते मान्य करणार नाही हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या रणांगणात एमआयएम स्वबळावरच मैदानात असणार आहे.
निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीमधूनच लढणार आहोत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, मनसे, माकपसह अन्य पक्ष सहभागी असतील. जागावाटपाचा मुद्दा आमच्यात प्रमुख नसणार आहे, उमेदवारी अर्ज भरायला सुरवात होण्यापूर्वी आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यावेळी सविस्तर चर्चा होऊन रणनिती निश्चित होईल. असे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.