सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने धाड टाकून केली प्लास्टिक जप्तीची मोठी कारवाई

महापालिकेने जप्त केला प्लास्टिकचा मोठा साठा ! संबंधितांकडून वसूल केला दहा हजाराचा दंड

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२७ डिसेंबर

सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दि. २७-१२-२०२४ रोजी चौपाड जुने विठ्ठल मंदिर येथे प्लास्टिक व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांनी अचानक धाड टाकून शासनाने बंदी केलेल्या प्लास्टिकचा अंदाजे ६ ते ८ टन इतका साठा जप्त करण्यात आला. संबंधित व्यापाऱ्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची किंमत सुमारे पाच लाख इतकी आहे. अचानक टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील व्यापारी व नागरिक यांना वेळोवेळी जाहीर आवाहन व प्रसिद्धीकरण देऊनही शहरात मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकची विक्री व वापर होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

त्यामुळे आयुक्त शीतल तेली-उगले यांचे आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांचे नियंत्रणाखाली संपूर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांचेकडून ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाईचे वेळी मा. अतिरिक्त आयुक्त रवि पवार समक्ष उपस्थित होते. त्यांच्या समवेत मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक  नागनाथ मेंडगुळे, सुर्यकांत लोखंडे, बाबासाहेब इंगळे,आरोग्य निरीक्षक राजशेखर वनारोटे, विठोबा शिंदीबंदे, सुनील राठोड, शेषराव शीरसट यांच्या सोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचारी यांनी ही कारवाई केली. या वेळी शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना शासनाने बंदी घातलेल्या  प्लास्टिकचा उत्पादन, वापर, विक्री, हाताळणी, वाहतूक व साठवणूक करू नये व वापरताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *