आणखीन १० ते १२ कावळ्यांचा बर्ड फ्ल्युमुुळेच मृत्यु ; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर…
घरगुती पक्षी तपासणीचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश !
प्रतीनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ मार्च
शहरात विविध ठिकाणी बारा कावळे, दोन घार व एक बगळा मृत्युमुखी पडल्याची घटना गेल्या २ दिवसांत घडली होती; दरम्यान, याचा तपासणी अहवाल भोपाळच्या लॅबमधून प्राप्त झाला असून, बर्ड फ्ल्युमुुळेच त्या पक्षांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शनिवार, (दि.१५) मार्च रोजीही १० ते १२ कावळ्यांचा यामुळेच मृत्यु झाल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित अधिकार्यांना घरगुती पक्षी तपासणीचे आदेश दिले आहेत. यामुळे आज दिवसभरात १४ टीमनी शहरातील विविध भागातून १०० घरगुती कोंबड्यांचे, कबुतरांचे नमुने तपासणीसाठी आणले आहेत. हे सॅम्पलही पुणे आणि भोपाळ येथील लॅबला सोमवारी पाठविण्यात येणार असल्याचे पशु चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले.दरम्यान, याचा अहवाल आल्यावर पुढील कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सोलापूर मनपा, जिल्हा आरोग्य प्रशासन आणि सर्वच पातळीवर बर्ड फ्ल्युचा नायनाट करण्यासाठी अधिकारी सज्ज झाले आहेत. या पक्षाच्या आजाराची लोकांना लागण होऊ शकणार नाही मात्र नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. यामुळे शहरातील विविध तीन ठिकाणे २१ दिवस प्रतिबंधित करण्यात आले आहेत. येथील किल्ला खंदकबाग, श्रीसिद्धेश्वर तलाव परिसर आणि धर्मवीर संभाजी महाराज तलाव या तिन्ही ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विशाल येवले, सहाय्यक आयुक्त डॉ. भास्कर पराडे आणि महापालिकेचे पशु शल्य चिकित्सक डॉ. सतीश चौगुले यांनी शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभागाच्या कर्मचार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
हिट स्ट्रोक मुळे किंवा विषबाधेमुळे मृत्यू झाला असेल असा प्राथमिक अहवाल जिल्हा आयुक्तांना पाठवला होता. त्यानंतर ९ मार्चला मृत पाच पक्षाचे नमुने पुण्यात तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले. नुकताच भोपाळ येथील हाय सिक्युरिटी निमल डिसीज प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जवळपास ३४ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. सर्व नमुने एच ५ एन १ या व्हायरसने पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा पशुवैद्यकीय सर्वच चिकित्सालय विभागाचे उपायुक्तांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना ही माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटिफिकेशन काढले. सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. वन्य पक्षांमध्ये बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; पण घरगुती कोंबड्या, बदके किंवा इतर पक्षी यांना कोणताही आजार अथवा लागण झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचेही डॉ. पराडे यांनी सांगितले. सध्या शहरात प्राथमिक खबरदारी घेतली जात आहे. संबंधित तिन्ही ठिकाणी स्वच्छता आणि औषध फवारणी केली जात आहे.
१० किलोमीटर हद्दीतील पक्षी नमुनेही घेतले…
किल्ला परिसर, छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसरातील गोल १ किलोमीटर परिघातील सर्व्हे करून काही घरगुती पक्षाचे नमुने शुक्रवारी घेवून पुणे लॅबकडे पाठविले आहेत. यानंतर शहरातील घरकुल, सैफूल, सात रस्ता, विमानतळ, बाळेगाव आदी विविध भागात संबंधित कर्मचार्यांना पाठवून तब्बल १०० घरगुती पक्षाचे नमुने शनिवारी घेतले आहेत. हे नमुने सोमवारी पुणे आणि भोपाळ लॅबला पाठविण्यात येणार आहेत. जर घरगुती पक्षात बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळला तर ० ते १ किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्यात येणार आहे.