सोलापूर महापालिका आयुक्तांचा पावसामुळे बाधित भागांचा दौरा, नागरिकांशी संवाद

नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे दिल्या सूचना…
सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले भरून वाहू लागले असून, अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची व्यथा जाणून घेतली.या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकूलवार, विभागीय अधिकारी व संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

विद्यानगर, शेळगी ब्रिज, दहिटणे गाव, मित्रनगर, जुना विडी घरकुल परिसरात आयुक्तांनी भेट देऊन बाधित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत तातडीने मदतीची मागणी केली.
गोंधळी वस्ती रोड, अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंप परिसर, व्रजेश्वरी नगर, सुनील नगर, नीलम नगर या भागांमध्येही घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आयुक्तांनी या भागांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी बॅरिगेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.तसेच महापालिकेच्या वतीने 8 जेसबी, 10 डंपर, पाणी उपास करणारी मशीन, जटिंग मशीन यांच्या सह मोठया प्रमाणत कर्मचारी सध्या काम करत आहेत.आपतकालणी यंत्रणा काम करत आहे. या शिवाय अग्निशमन विभाग हे ज्या ठिकाणी नागरिक अडकले आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याच बरोबर ऍम्ब्युलन्स सह आरोग्य यंत्रणा देखली सर्व सज्ज करण्यात आले आहे.आवश्यक असल्यास नागरिकांना स्थलानंतर करण्याकरीता यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

नालेवरील अतिक्रमण व चुकीच्या ले-आउटमुळे पाणी अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले असून, आयुक्तांनी याबाबत चौकशी करून नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच संबंधित अभियंते व विभाग प्रमुखांना तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेश त्यांनी दिले.
महापालिकेच्या वतीने अग्निशामक विभाग, जेसीबी यंत्रणा, आरोग्य विभाग तसेच २४ तास आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. पाणी घरात शिरल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही आयुक्तांनी नागरिकांना केले.
आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या की, “नागरिकांना पाणी साचणे वा घरात पाणी शिरणे यामुळे होणारा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी. पावसाळ्यातील कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी दक्षता घ्यावी.”